कॉर्पोरेट नोकरी सोडली अन् सुरू केली नर्सरी; आता करतोय ३० लाखांची कमाई! कशी वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 07:35 AM 2022-11-22T07:35:14+5:30 2022-11-22T07:41:04+5:30
डेहराडूनच्या सचिन कोठारीचे संपूर्ण आयुष्य त्याच्या लॅपटॉपभोवती फिरत होतं. २००८ ते २०११ या काळात त्यानं दिल्लीत चार नोकऱ्या बदलल्या, पगार चांगला झाला पण परिस्थिती बदलली नाही. कॉर्पोरेट जॉबचा ताण त्याच्या तब्येतीला खूप त्रास देत होता. डोळ्यासमोर लॅपटॉपचा स्क्रीन असला तरी मनात मात्र शेती आणि गावची हिरवळ खुणावत होती.
एके दिवशी त्यानं मनाशी पक्कं केलंच आणि नोकरीचा राजीनामा देऊन गावी परतला. त्याचा हा निर्णय योग्यही ठरला आणि आज तो आपल्या आवडीचं काम करत आहे. महत्वाचं म्हणजे नोकरीत जेवढं शक्य नव्हतं तितकं तो आज नर्सरीतून कमावतोय.
सचिनच्या डोक्यात डेहराडूनमध्ये नर्सरी सुरू करण्याची कल्पना होती जी त्याच्या नातेवाईकाकडून त्याला मिळाली होती. सचिन नोकरी करत असतानाच एक नर्सरी सुरू करण्याचा विचार करत होता. त्याबद्दल रिसर्चही केला होता. त्यानं त्याच्या एका मित्राची मदत घेतली ज्याच्याकडे जमीन होती. यानंतर दोघांनी नर्सरीमध्ये ६ लाख रुपये गुंतवण्याचं ठरवलं.
सचिनकडे दीड लाख रुपये होते आणि तेवढीच रक्कम वडिलांकडून उसने घेतली होती. त्याच्या मित्रानं ३ लाख रुपये उभे केले. अशाप्रकारे २०१२ साली नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी नर्सरी सुरू केली. त्याला 'देवभूमी नर्सरी' असं नाव दिलं. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. अनेक प्रयत्न करूनही, झाडांना कीटकांचा प्रादुर्भाव झाला आणि त्यापैकी बहुतेक झाडं कोरडी पडली.
सचिनच्या व्यवसायात भागीदार बनलेल्या त्याच्या मित्राची हिंमत संपली आणि त्यानं माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता सचिन एकटा राहिला. त्याच्या कुटुंबीयांनीही सचिनला पुन्हा नोकरी करण्याचा सल्ला दिला. पण सचिनला ते मान्य नव्हतं.
पुढील तीन वर्षे म्हणजे २०१५ पर्यंत नर्सरी पुन्हा सुरू करण्यात तो धडपडत होता. त्यानं इतर तज्ज्ञांकडून बागकाम शिकलं, यूट्यूबवरून नर्सरीची काळजी घेण्याबाबतचे बारकावे जाणून घेतले. नातेवाईकांचेही मार्गदर्शन घेतले. यानंतर त्यांनी शहरापासून १५ किमी अंतरावर जमीन भाड्यानं घेऊन रोपवाटीका सुरू केली. आज त्यांच्याकडे स्वतःची १५०० चौरस फूट जमीन आहे.
हळूहळू सचिनची नर्सरी नव्यानं उभी राहिली. यामध्ये विविध फुलांचे सुमारे २० प्रकार आहेत. याशिवाय ब्रोकोली, टोमॅटो, बोक चॉय, वांगी, फ्लॉवरची झाडेही त्यात लावली आहेत. याच्या विक्रीतून त्यांना दरवर्षी सुमारे ३० लाख रुपये मिळतात.
सहारनपूर, गाझियाबाद, चंदीगड, दिल्ली, जालंधर, लुधियाना आणि अमृतसरपर्यंत त्याच्या वनस्पतींना मागणी आहे. आज तो आनंदी आहे की त्याच्याकडे त्याचे मन, धन, आरोग्य आणि मनःशांती आहे. नोकरी सोडण्याचा घेतलेला निर्णय त्यानं सार्थ ठरवून दाखवला आहे.