हृदयस्पर्शी! मुलगा गेल्यावर सासू-सासऱ्यांनी लावलं सुनेचं दुसरं लग्न; केलं कन्यादान, भेट दिली कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 11:22 AM2022-12-07T11:22:12+5:302022-12-07T11:27:31+5:30

जगपाल सिंह यांनी समाजासमोर अनोखा आदर्श उभा केला आहे. त्यांनी आपल्या विधवा सुनेचा मोठ्या थाटामाटात पुनर्विवाह करून दिला.

सहारनपूरच्या सावंत खेडी गावचे माजी प्रमुख जगपाल सिंह यांनी समाजासमोर अनोखा आदर्श उभा केला आहे. त्यांनी आपल्या विधवा सुनेचा मोठ्या थाटामाटात पुनर्विवाह करून दिला. सिंह यांनी आपल्या विधवा सुनेचे लग्न तर केलेच, पण मुलीप्रमाणे 'कन्यादान' करून तिची पाठवणी केली. या स्तुत्य निर्णयामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूरच्या बुडगाव शहरातील सावंत खेडी गावचे माजी प्रमुख जगपाल सिंह यांचा मुलगा शुभम राणा याचे लग्न हे 2021 मध्ये मेरठ जिल्ह्यातील सलावा गावात राहणाऱ्या मोना या तरुणीशी झाले होते. मात्र, घरात लग्नाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

लग्नाच्या तीन महिन्यांनंतर शुभमने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूनंतर जगपाल सिंह यांचे दु:ख वाढले. त्यांना आपल्या सुनेच्या भविष्याची काळजी वाटू लागली. त्यांनी सुनेला आपल्या मुलीचा दर्जा दिला आणि कुटुंबीयांशी चर्चा करून तिचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या सुनेचेही त्यांनी याबाबत मत घेतले. सुनेने होकार दिल्यावर त्यांनी हरियाणातील गोलनी येथे राहणारा सागर याच्याशी आपल्या सुनेचं लग्न निश्चित केले. सागरच्या कुटुंबासोबत पूर्वीपासूनच नातेसंबंध होते. नात्याने ते जगपाल सिंह यांचे भाचे आहेत.

4 डिसेंबर रोजी वऱ्हाडी आले आणि सराहनपूर शहरातील एका बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. सिंह यांनी आपल्या सूनेचं कन्यादान केलं आणि मुलीप्रमाणे तिची सासरी पाठवणी केली. तसेच सुनेला लाखो रुपयांची कार आणि वस्तू भेट म्हणून दिल्या.

जगपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या सुनेला नेहमी मुलीसारखे वागवले आणि तिचे भविष्य पाहून तिचा पुनर्विवाह करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांनी पुढे सांगितले की त्यांचा भाचा सागर हा सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबातील आहे. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :लग्नmarriage