सावधान! मोबाईल चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या बॅंकेतील रक्कम लंपास, SBI ने केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 02:41 PM2019-12-10T14:41:24+5:302019-12-10T14:46:13+5:30

आपण कोणत्याही रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, विमानतळ किंवा अशा कोणत्याही ठिकाणी उभारलेल्या चार्जिंग स्टेशन वापरत असल्यास सावधगिरी बाळगा. याठिकाणी फोन चार्ज करताना आपल्या मोबाइलमधील महत्त्वाचा डेटा आणि पासवर्ड हॅक करण्याचा धोका असू शकतो. हॅकर्स देखील आपला महत्वाचा डेटा हॅक करून आपल्या बँक खात्यातील रक्कम काढू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनमध्ये फोन चार्ज करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट केलं आहे. चार्जिंग स्टेशनजवळ हॅकर्स तुमची वाट पाहत असतील आणि तुम्ही त्यांच्या जाळ्यात फसाल. आपल्या फोनचा डेटा काही मिनिटांच्या आत हॅक केला जाऊ शकतो. म्हणूनच विनामूल्य फोन चार्जिंग स्टेशन वापरताना काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

चार्जिंग स्टेशनवर फोन चार्ज करण्यापूर्वी, चार्जिंग स्टेशनच्या मागे इलेक्ट्रिक सॉकेट तपासणे सुनिश्चित करा.

सुरक्षित मार्ग म्हणजे आपली मोबाईल चार्जिंग केबल नेणे आणि त्यातून मोबाइल चार्ज करणे.

थेट इलेक्ट्रिक आउटलेटच्या मदतीने मोबाईल चार्ज करा.

शक्य असल्यास, आपल्या बरोबर पोर्टेबल बॅटरी चार्जर सोबत ठेवा, आवश्यकतेनुसार मोबाइल चार्ज करा.