ईडीची पिडा, राज ठाकरेंचं भाषण, काँग्रेसची नाराजी अन् राष्ट्रपती पद!; पवार-मोदी भेटीमागची 'पंच'सूत्री By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 03:03 PM 2022-04-06T15:03:07+5:30 2022-04-06T15:09:40+5:30
दिल्लीत आजवर ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट होते त्या त्या वेळी राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण सुरू होतं. दिल्लीत आजवर ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट होते त्या त्या वेळी राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण सुरू होतं. आजही दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच कालावधीनंतर वन-टून-वन भेट झाली आहे. संसदेच्या पंतप्रधान कार्यालात दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात २० ते २५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण यावेळीची मोदी-पवार भेट पाच कारणांसाठी महत्वाची मानली जात आहे.
मोदी आणि पवार यांच्यात गेल्या वर्षी १७ जुलै रोजी शेवटची भेट झाली होती. त्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. मग ते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल असो किंवा मग राज्यात ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे राष्ट्रवादीचे दोन महत्वाचे नेते सध्या तुरुंगात आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे पाच कारणं अतिशय महत्वाची मानली जात आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
'मविआ' नेत्यांमागे 'ईडी'ची पिडा महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावून विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवार केंद्र सरकारवर करत आले आहेत. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केंद्रातील सरकारकडून होत असल्याचा थेट आरोप पवारांनी केला आहे. यातच राष्ट्रवादीचे दोन मंत्री आज तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांचा ताबा आज सीबीआयनं घेतला आहे. तर नवाब मलिक देखील न्यायालयीन कोठडीत आहेत. यामागे केंद्र आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचं पवार वारंवार बोलत आले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत ईडीच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
संजय राऊतांवर ईडीची कारवाई शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या संजय राऊत यांच्याशी निगडीत संपत्ती कालच ईडीनं जप्त केली आहे. यात अलिबाग येथील ८ प्लॉट आणि दादरमधील त्यांच्या राहत्या घराचा समावेश आहे. ईडीच्या याच कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीत पवार आणि मोदी यांच्यात भेट झाली आहे. त्यामुळे या कारवाईच्या पार्श्वभूमीवार दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाली असेल का असा प्रश्न उपस्थित होण्यास वाव आहे.
राज ठाकरेंचं भाषण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात थेट मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. राज यांच्या भाषणावर राज्यातील भाजपा नेत्यांनीही समर्थनाची भूमिका घेतलेली दिसत आहे. राज यांच्या या हिंदुत्ववादी धोरणामुळे आगामी महापालिका निवडणुकीत नवंसमीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली असू शकते.
काँग्रेसची नाराजी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी नुकतीच पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीवेळी काँग्रेसचे प्रभारी किंवा प्रदेशाध्यक्ष देखील उपस्थित नव्हते. सोनियांनी नाराज आमदारांना वेळ देत प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारींशिवाय बैठक घेतली. यात काँग्रेसच्या नाराज आमदारांनी राज्यातील मंत्र्यांविषयी तक्रारीचा पाढा सोनियांसमोर मांडल्याचं सांगतिलं जात आहे. त्यामुळे राज्यातील या राजकीय घडामोडींवरही मोदी आणि पवारांच्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. शरद पवारांचं नाव पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. पण पवारांनी यासाठी आपण इच्छुक नसल्याचं याआधी म्हटलं होतं. असं असलं तरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानेही आजच्या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.