शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात अर्धा तास खलबतं; 'या' ५ मुद्यांवर झाली चर्चा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:36 PM 2021-03-16T19:36:37+5:30 2021-03-16T19:42:19+5:30
Sachin Vaze - राज्यातील एकूण घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमधील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. (shiv sena leader sanjay raut meets sharad pawar at delhi) नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण तापताना पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने (BJP) गेल्या वर्षभरातील अनेकविध घटनांचा हवाला देत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तसेच काही मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील एकूण घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमधील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक झाली. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मंत्र्यांशी चर्चा केली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. (shiv sena leader sanjay raut meets sharad pawar at delhi)
शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीत पाच मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, शिवसेना नेते एकनाथ शिंदे हेदेखील शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीत असल्याचे सांगितले जात आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यात अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. आता वाझेंना अटक झाल्याने विरोधकांनी थेट देशमुखांचा राजीनामा मागितला आहे.
गृहमंत्री बदलल्यास विरोधकांकडून होणारी टीका थोपवता येईल, यावर शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. यावेळी अजित पवार किंवा जयंत पाटील यांच्याकडे गृहखाते देण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.
मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांची बदली आणि परम बीर सिंह यांच्या जागी रजनीश सेठ यांना पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गुन्हे अन्वेषण विभागामध्ये अनुभवी आणि स्वच्छ अधिकाऱ्याला आणणे आणि त्यासाठी काही नावांवरही चर्चा झाल्याचे समजते.
अँटालिया प्रकरण NIA कडे गेले आहे. मनसुख हिरेन प्रकरणही अँटालिया प्रकरणाशी संबंधित होते. या पार्श्वभूमीवर हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपासही NIA करू शकतात. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
विरोधकांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार नारायण राणे आणि खासदार नवनीत राणा यांनी गृहमंत्र्यांना तसे पत्र दिले आहे. या विषयावरही संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.