Shivsena: शिंदे गटाचा मोठा दावा, 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी दिलाय 'हा' आकडा By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 09:57 PM 2023-01-30T21:57:54+5:30 2023-01-30T23:04:07+5:30
शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत शिंदे-ठाकरे गटात वाद सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत हा वाद पोहचला असून दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयोगाने 30 जानेवारीपर्यंत शिंदे-ठाकरे गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याची मुदत दिली होती. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत शिंदे-ठाकरे गटात वाद सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत हा वाद पोहचला असून दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयोगाने 30 जानेवारीपर्यंत शिंदे-ठाकरे गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याची मुदत दिली होती.
आज कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून युक्तिवाद सादर केला. त्यानंतर शिंदे गटानेही आयोगासमोर लेखी युक्तिवाद सादर केला आहे. आता निवडणूक आयोग हे दोन्ही युक्तिवाद तपासून कुठल्याही क्षणी त्यांचा निर्णय घोषित करू शकतात.
निवडणूक आयोगात ठाकरे गटाचा 112 पानांचा, शिंदे गटाचा 124 पानांचा युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. 10 व्या शेड्युल नुसार या लोकांनी पक्ष सोडला, त्यामुळे ते पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. तर, शिंदे गटाने 199 प्रतिनिधी आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय.
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालात 40 शिवसेना नेते, 6 उपनेते, 13 खासदार, 40 आमदार, 49 जिल्हाप्रमुख, 87 विभाग प्रमुख असे एकूण प्रतिनिधी सभेतले 282 पैकी 199 लोक आपल्या बाजूने असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, शिवसेनेची जी घटना आहे त्यावर आम्ही मुद्दे सादर केलेत. पक्षाची मान्यता ही त्या राज्यात, देशात किती मतदान होते त्यावर अवलंबून असते.
आमदार, खासदार यांच्यावर हे मतदान अवलंबून असते. त्यामुळे लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे जास्त त्यांचे मतदान ग्राह्य धरले जाते. त्यावर आम्ही युक्तिवाद मांडला आहे.
मुख्य नेता पद हे घटनात्मक आहे ही बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. संपूर्ण प्रक्रिया करूनच मुख्य नेता हे घटनात्मक पद निर्माण करण्यात आले. ही बाजू कायदेशीर रित्या आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडली आहे, असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासंदर्भात लिखीत अहवाल दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाला सादर झाला आहे. त्यामुळे, आता आयोगाकडून कधीही निर्णय दिला जाऊ शकतो आणि धनुष्यबाण कोणाचा ह्याचा निकाल लागू शकतो.