धक्कादायक ! कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत तरीही 'तो' पॉझिटीव्ह, डॉक्टरही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:18 PM2020-04-25T17:18:46+5:302020-04-25T17:32:08+5:30

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली. यामध्ये गेल्या २४ तासांतील सापडलेले नवे रुग्ण, मृत्यू यांची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी कोरोनाची भीती काहीशी दूर करणारी ठरणार आहे.

भारतात आतापर्यंत एकूण 24,506 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी 5063 जण बरे झाले असून ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या विविध राज्यांमध्ये 18,668 जण उपचार घेत आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १४२९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

मात्र, दुसरीकडे एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे, ती म्हणजे कोरोनाची कुठलीही लक्षणे नसताना एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली आहे.

विशेष म्हणजे वाराणसीची यात्रा करुन ५० दिवस उलटले तरीही कुठलीही लक्षणे या व्यक्तीमध्ये आढळून आली नाहीत. मात्र, ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत.

२० एप्रिल रोजी संबंधित व्यक्तीला वाराणसीच्या एसएसपी यांनी जमातींच्या यात्रेसंबंधी विचारणा केली होती, यावरुन यात्रेदरम्यान हा युवक एका तबलिगी जमातीच्या बाजूला बसल्याचे सिद्ध झाले होते.

त्यानंतर, या युवकाची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आल, त्यावेळी ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर, युवकाच्या कुटुंबातील १८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आता, या युवकाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध पोलीस यंत्रणांकडून घेण्यात येत आहे. तर, ती व्यक्ती काम करत असलेल्या वीमा कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आलंय.

पोलिसांकडून या युवकाच्या संपर्कात आलेल्या ५० ते ६० व्यक्तींची स्क्रिनिंगही करण्यात येणार आहे. त्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांनाही क्वारंटाई करण्यात येईल.