Coronavirus Vaccination : मुलांना कोरोना लस द्यायचीय खरी! पण पालकांना सतावतायत अनेक प्रश्न, तुम्हालाही?...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:31 PM2021-12-29T15:31:04+5:302021-12-29T15:41:40+5:30

Coronavirus Vaccination : भारत सरकारनं १५ ते १८ या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यास परवानगी दिली आहे.

Coronavirus Vaccination : ३ जानेवारी २०२२ पासून देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळाच्या दिवशी याबाबत घोषणा केली होती. यासाठी आता १ जानेवारीपासून CoWIN अॅपवर यासाठी नोंदणी सुरू होईल.

यासाठी मुले त्यांचे कोणतेही एक ओळखपत्र वापरुन रजिस्ट्रेशन करू शकतील. याशिवाय, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर डोस आणि ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनाडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस दिला जाईल.

अधिकृत आकडेवारीनुसार, देशात १५-१८ वयोगटातील सुमारे १० कोटी मुले आहेत. या मुलांना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. लहान मुलांसाठी लसीची मागणी देशात खूप दिवसांपासून केली जात होती.

सध्या जगभरातील ३० हून अधिक देशात मुलांना कोरोनाची लस देत आहेत. क्युबामध्ये २ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांचं लसीकरण केले जात आहे, तर दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्समध्ये १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना लस दिली जात आहे.

अनेकांनी आपल्या देशात घेण्यात आलेल्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. परंतु पालकांच्या मनात आजही काही प्रश्न आहेत. मुलांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली तर बरं होईल, असं पालकांचं म्हणणं आहे. काही पालक धार्मिक आधारावर आणि काही लस किती प्रभावी आहे याबाबत गोंधळलेल्या स्थितीत आहेत.

मुलांनी लस घ्यावी का? हा मुख्य प्रश्न काही पालकांच्या मनात आहे. मुलाचं कोरोनासारख्या महासाथीपासून बचाव करण्याचं एकमेव साधन म्हणजेच कोरोना प्रतिबंधात्मक लस आहे. याचा संसर्ग कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर लसीकरण हाच एकमेव मार्ग दिसत आहे. जरी लसीमुळे पूर्णपणे सुरक्षा मिळाली नाही, तरी कोरोनाची लक्षणं गंभीर होण्यापासून बचाव होऊ शकतो.

याचे काही साईड इफेक्ट्स असतील का असाही प्रश्न अनेकांच्या मनात असल्याचं दिसून येत आहे. ड्रग्‍स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया द्वारे अनेक चाचण्या केल्यानंतरच मुलांसाठी करोना प्रतिबंधात्मक लसीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या लसीचा प्रभाव आणि अन्य बाबींबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.

अलीकडेच, दोन औषधांच्या वैद्यकीय चाचणीला ड्रग कंट्रोल बॉडीनं मान्यता दिली आहे आणि लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे सांगितले आहे. ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, आळस, अंगदुखी आणि थकवा यासारखी काही सौम्य लक्षणे अजूनही दिसू शकतात.

DGCI ने देशात मुलांसाठी दोन लसींना मान्यता दिली आहे. भारत बायोटेकच्या Covaxin ला गेल्या आठवड्यात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत लसीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये, १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी झायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी देण्यात आली होती.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी Cowin App वर जा. तुमचा मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल, तो टाकून लॉग इन करा. आता तुमचा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.

तुम्ही निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्मतारीख निवडा. मेंबर अॅड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल. आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्या. लसीकरण केंद्रावर, तुम्हाला आयडी आणि कोड द्यावा लागेल, हा तुम्हाला नोंदणी केल्यावर मिळतो.

पंतप्रधानांच्या घोषणेनंतर देशपातळीवर लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतातील मुलांना भारत बायोटेकचे कोव्हॅक्सिन किंवा झायडस कॅडिलाचे ZyCoV-D, यापैकी एक डोस दिला जाऊ शकतो. या दोन्ही लसी १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी मंजूर करण्यात आल्या आहेत.