Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबची नवी चाल?; जेलमध्ये वाचायला हवीत 'कायद्याची पुस्तकं' By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 03:37 PM 2023-01-12T15:37:49+5:30 2023-01-12T15:59:57+5:30
Shraddha Walker Murder Case : आफताब अमीन पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. साकेत न्यायालयाने मंगळवारी आफताब अमीन पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली. त्याच्यावर त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या, तिचे तुकडे करण्याचा आणि नंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात फेकल्याचा आरोप आहे.
कारागृहात आफताबला आता पुरेसे उबदार कपडे उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले. आफताब हा न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाला, त्याने तुरुंगात वाचण्यासाठी कायद्याशी संबंधित पुस्तके उपलब्ध करून देण्याची विनंती न्यायालयाला केली.
मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट अविरल शुक्ला यांच्या सूचनेनुसार आफताबला त्यांच्यासमोर हजर करण्यात आले. यापूर्वी त्याचं न्यायालयासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादरीकरण करण्यात येत होतं.
उबदार कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी त्याचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड देण्याच्या आफताबच्या अर्जाला पोलिसांनी विरोध केला. तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपीच्या गोष्टी रिलीज करणार नाहीत, कारण तपासासाठी या गोष्टींची गरज असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.
आफताबने त्याचे वकील एमएस खान यांच्यामार्फत न्यायालयात आणखी एक अर्ज केला आणि कायद्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. आफताब म्हणाला की, तुरुंगात त्याला कायद्याची पुस्तके वाचायला द्यावीत.
यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला विचारले की, तुम्हाला तुमचा खटला स्वबळावर लढवायचा आहे का? उत्तरात आफताबने सांगितले की, फक्त वकीलच खटला लढेल, पण त्याला यात आपल्या वकिलाची मदत करायची आहे.
आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, न्यायालयाने यासाठी परवानगी दिली आहे आणि ते तुरुंग अधिकारी किंवा त्याच्या वकिलाकडून ही पुस्तके गोळा करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चार्जशीट तयार होईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांना काही दिवसांपूर्वी ऑडिओ पुरावे मिळाले आहेत. पोलिसांना आफताबचा एक ऑडिओ मिळाला आहे. यामध्ये आफताब श्रद्धासोबत भांडत आहे. या ऑडिओमध्ये आफताब आणि श्रद्धा यांच्यात वाद सुरू असल्याचं ऐकू येत आहे. इतकंच नाही तर आफताब श्रद्धाला टॉर्चर करत होता हे ऑडिओवरून सिद्ध होत आहे.
दिल्ली पोलीस या ऑडिओला मोठा पुरावा मानत आहेत. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा ऑडिओ हत्येचा नेमका हेतू शोधण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या ऑडिओशी आफताबचा आवाज जुळण्यासाठी पोलीस त्याच्या आवाजाचा नमुना घेणार आहेत.
सीबीआयची सीएफएसएल टीम आफताबच्या आवाजाचा नमुना घेईल. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली आहे. यापूर्वी त्याला पॉलीग्राफ चाचणीलाही सामोरे जावं लागलं होतं. पोलिसांच्या चौकशीत आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचं सांगितलं होतं.