12वी पास तरुण भाजी विकून झाला करोडपती; 10 हजारांत सुरू केला व्यवसाय, 4 कोटींची उलाढाल By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 12:43 PM 2022-12-09T12:43:52+5:30 2022-12-09T12:56:44+5:30
Shubham Belthare : न डगमगता ऑनलाईन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि आज तो वर्षाला तब्बल 4 कोटींची उलाढाल करतो. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोट्यवधी रुपये कमवता येतात हे एका तरुणाने सिद्ध केलं आहे. तरुणाने भाजी विक्रीचा व्यवसाय करुन ही मोठी झेप घेतली आहे. शुभम बिलथरे असं या तरुणाचं नाव आहे. शुभम हा मध्यप्रदेशातील सागर येथील रहिवासी आहे. तो 'भिंडी बाजार' नावाने स्टार्टअप चालवतो.
शुभम बारावी पास आहे. कॉलेजची फी न भरल्यामुळे त्याला बी.टेकचे शिक्षण सोडावे लागले होते. मात्र, यानंतरही त्याने हार मानली नाही. न डगमगता ऑनलाईन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि आज तो वर्षाला तब्बल 4 कोटींची उलाढाल करतो. तसेच त्यातील सुमारे 1.5 कोटींचा नफा कमावतो आहे.
2013 ते 2020 पर्यंत त्याने 10 ते 12 खासगी नोकऱ्या केल्या. मात्र, दरमहा अशाप्रकारे 10-12 हजार रुपयांची नोकरी किती दिवस करायची, असा विचार त्याने केला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेला असताना त्याने छोटीशी नोकरीसोबतच वेब डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आणि या कालावधीत लोक घरातच अडकल्याने मोठ्या शहरांमध्ये ऑनलाईन होम डिलिव्हरीची मागणी वाढली. लोक ऑनलाईन भाजीपालाही मागवू लागले. त्यातच दुसऱ्या लॉकडाऊननंतर शुभम मुंबईहून सागरला परतला. त्यानंतर त्याने भाजीपाला व्यवसाय सुरू करायचे ठरवले.
आज या तरुणाचे 4 स्टोअर आहेत. त्यापैकी एक सिधगाव येथे आहे तर उर्वरित 3 दुकाने मक्रोनिया परिसरात आहेत. तो थेट बाजारातून भाजीपाला खरेदी करत असल्याने बाजारापेक्षा 5% कमी दरात लोकांपर्यंत ऑनलाईन डिलिव्हरी करतो. त्याने 'भिंडी बाजार' नावाचे एप आणि वेबसाइट तयार केली.
घरोघरी जाऊन लोकांना या व्यवसायाबद्दल सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना विश्वास बसत नव्हता. मात्र नंतर एक-दोन दिवसांत 10 ग्राहक झाले. रोज पहाटे 3-4 वाजता बाजारात जाणे हा त्याच्या आणि त्याच्या टीमचा दिनचर्येचा भाग झाला. नंतर शुभम जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत पोहोचू लागला.
सर्व भाज्या घरपोच आणि बाजारभावात मिळाल्यावर ग्राहकदेखील खूश होते. भिंडी बाजारच्या एपद्वारे, कोणताही ग्राहक त्यांच्या स्थानानुसार वेबसाइट किंवा अॅपला भेट देऊन फळे आणि भाज्यांची ऑर्डर बुक करू शकतो. यासोबतच शहरात आधीच सुरू असलेली मोठी दुकाने, जिथे ग्राहकांची मोठी गर्दी जमते, त्याठिकाणी त्यांना त्याने काही टक्के कमिशन दिले आणि भाजीचे स्टॉल लावायला सुरुवात केली.
शुभमचा व्यवसाय आता चांगला वाढला आहे. त्याचा भाऊसुद्धा आता त्याच्यासोबत या व्यवसायात आहे. त्यांची एकूण 15 जणांची टीम काम करत आहे. ते डिलिव्हरीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत आहेत. त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दररोज याठिकाणी ते 90 हजारांचा भाजीपाला विकतात. तसेच ग्राहकांच्या प्रंचड प्रतिसादामुळे दोन तीन दिवस आधीच बुकींग करावी लागते.
आता पुढील काही महिन्यांत आम्ही मल्टी शॉपसाठी एक एप लॉन्च करणार आहोत जिथे विक्रेते भाज्यांव्यतिरिक्त विविध उत्पादने विकू शकतील. आम्हाला एक निश्चित कमिशन असेल. सागर व्यतिरिक्त, आम्ही दमोह, कटनी, भोपाळ आणि इतर राज्यांसह इतर शहरांमध्ये 'भिंडी बाजार' सुरू करण्याची तयारी करत आहोत असंही शुभने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व फोटो - दैनिक भास्कर