Coronavirus Vaccine Adar Poonawalla : "कोरोना लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या डोसमधील अंतर कमी व्हावं, सरकारला प्रस्ताव देणार" By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:41 PM 2022-04-12T16:41:09+5:30 2022-04-12T16:50:26+5:30
Coronavirus Vaccine Adar Poonawalla : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदर पूनावाला यांचं वक्तव्य. Coronavirus Vaccine Adar Poonawalla : देशात सध्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. याचदरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा (Coronavirus Vaccine Booster Dose) बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झालीये.
परंतु कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतरावरून अद्यापही चर्चा सुरू आहे. आता सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी हा मुद्दा उचलला आहे.
दरम्यान, कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरच बूस्टर डोस घेण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. जर तुम्ही जानेवारी २०२२ मध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला असेल, तर बूस्टर डोस नोव्हेंबर २०२२ पर्यंत वाट पाहावी लागते. दरम्यान, दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर हे सहा महिन्यांपर्यंत करण्यात यावी असं अदर पूनावाला म्हणाले.
""सध्या कोविड लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कारण आपल्याकडे असा नियम आहे की तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसदरम्यान ९ महिने थांबावे लागेल. आम्ही सरकारला ते कमी करून आणखी ६ महिने कमी करण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही हा कालावधी कमी करून ६ महिने करण्याचा प्रस्ताव देऊ," असंही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी ६० वर्षांवरी व्यक्तींना आणि ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांना कोरोनाचा बूस्टर डोस घेण्याची परवानगी सरकारनं दिली होती. परंतु त्यानंतर सरकारनं १० एप्रिल पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस घेता येणार असल्याचं म्हटलं.
परंतु यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर ९ महिन्यांचं असावं असंही सांगण्यात आलं. खासगी रुग्णालये किंवा लसीकरण केंद्रांवर हे बूस्टर डोस घेता येणार आहे. सध्या १८ ते ५९ या वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत.