Single use plastic: दरवर्षी २.४ लाख टन सिंगल युझ प्लास्टीक भारतात होतं निर्माण, आता या १९ गोष्टींवर बंदी By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:41 PM 2022-06-29T15:41:07+5:30 2022-06-29T16:07:38+5:30
Single use plastic: केंद्र सरकार १ जुलैपासून सिंगल युझ प्लास्टीक पासून तयार केल्या जाणार्या १९ वस्तूंवर बंदी घालणार आहे. त्यानंतर त्यांचा वापर करणे बेकायदेशीर ठरेल आणि तसे केल्यास शिक्षेचीही तरतूद आहे. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय आणि बंदी का आवश्यक आहे? पाहूया. १ जुलैपासून देशात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारने आता एकेरी वापरल्या जाणार्या प्लॅस्टिकच्या 19 वस्तूंवर बंदी घातली आहे. १ जुलैपासून या वस्तूंचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि निर्यात करण्यावर पूर्ण बंदी असेल. एकेरी वापराच्या प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे यासाठी ही बंदी घालण्यात येत आहे.
सिंगल यूज प्लास्टिक ही अशी वस्तू आहे जी प्लास्टिकपासून बनलेली असते आणि एका वापरानंतर फेकून दिली जाते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सरकारचे म्हणणे आहे की, प्रतिबंधित वस्तूंमध्ये अशा प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे, ज्यांचा कमी वापर केला जातो आणि जास्त कचरा पसरतो.
सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो किंवा फेकून देऊ शकतो आणि ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.
पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत सिंगल युझ प्लास्टिकनं तयार झालेल्या 19 वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी आता या वस्तू वापरत असेल तर त्याला या कायद्याच्या कलम 15 अंतर्गत दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कलम 15 मध्ये 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
यामध्ये प्लास्टीक स्टीक असलेले इयरबड्स, फुग्यांसाठी वापरण्यात येणारी प्लास्टीक स्टीक, प्लास्टीकचे झेंडे, कँडी स्टीक, आईसक्रिम स्टीक, थर्माकोल, प्लास्टीकच्या प्लेट्स, कप, ग्लास, कटलरी, प्लास्टीकचे काटे, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांवर रॅप होणारी फिल्म, इन्व्हिटेशन कार्ड, सिगरेटची पाकिटं, 100 मायक्रॉन पेक्षा कमीचं प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टरर या गोष्टींचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत समुद्रात 20 कोटी टन प्लास्टीक कचरा गेला आहे. 2016 पर्यंत प्रत्येक वर्षी 1.4 कोटी टन प्लास्टीक कचरा समुद्रात जात होता. 2040 पर्यंत दरवर्षी 3.7 कोटी टन पर्यंत कचरा समुद्रात जाण्याचा अंदाज आहे.
भारताबद्दल सांगायचं झालं तर सर्वेक्षणानुसार दररोज 26 हजार टन प्लास्टीक कचरा निघतो. यापैकी केवळ 60 टक्केच एकत्र केला जातो. अन्य कचरा नदी किंवा नाल्यांमध्ये पडून राहतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार भारतात दरवर्षी 2.4 लाख टन सिंगल युझ प्लास्टीक तयार होतं. याहिशोबानं दरवर्षी एक व्यक्ती 18 ग्राम सिंगल युझ प्लास्टीक तयार करतो.
केंद्र सरकारं आतापर्यंत 19 वस्तूंवर बंदी घातली आहे. यामध्ये आणखी वस्तू जोडण्याची शक्यता आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानं याच्या पर्यायांबाबतही काही सूचवलं आहे.
प्लास्टीक बॅगच्या ऐवजी कॉटन बॅगचा वापर केला जाऊ शकतो. याप्रकारे प्लास्टीकच्या चमच्याऐवजी बाम्बू स्टीकचा वापर करता येईल. प्लास्टीक कप ऐवजी कुल्हड वापरू शकता, असं पर्याय सुचवण्यात आले आहेत.