म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 07:04 IST2020-09-03T06:51:45+5:302020-09-03T07:04:48+5:30
भारत आणि चीनमध्ये विवाद निर्माण झालेला भाग हा ब्लॅक टॉप पर्वतापासून जवळ आहे. तसेच हा भाग चुशूलपासून २५ किमी पूर्वेला आहे.

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. त्यात पँगाँग सरोवराच्या परिसरात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गेल्या आठवड्यात पुन्हा झटापट झाल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराने पँगाँगमध्ये घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याला जोरदार दणका दिला आहे. पँगाँगमध्ये सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ब्लॅक टॉपवर कब्जा करत भारतीय लष्कराने या क्षेत्रात चीनवर सामरिक आघाडी घेतली आहे.
ब्लॅक टॉप ही पँगाँगमध्ये सरोवरातील अशी जागा आहे जिथून पँगाँग सरोवरातील चिनी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता येतो. त्यामुळेच ब्लॅक टॉपवर भारताने केलेला कब्जा आणि रणनीतिक आघाडी घेतल्याने चीनचा तीळपापड झाला आहे.
भारतीय लष्कराने या भागाला चिनी सैन्याच्या तावडीतून मुक्त केले आहे. तसेच तिथे असलेले चिनी सैन्याचे सीसीटीव्ही आणि इतर उपकरणे हटवली आहेत.पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर म्हणजेच ब्लॅक टॉपवर आता भारतीय लष्कराचा कब्जा आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा भाग वादाचे केंद्र बनलेला आहे. पँगाँग सरोवर हे सुमारे चार हजार २७० मीटर उंचीवर आहे. तसेच या सरोवराची लांबी सुमारे १३५ किमी आहे.
हे संपूर्ण क्षेत्र ६०० चौकिमी आहे. या सरोवराच्या सुमारे दोन तृतीयांश क्षेत्रावर चीनचा कब्जा आहे. तर सुमारे ४५ किमी क्षेत्र भारताच्या अधिकारात आहे. सरोवराच्या पश्चिम भागाला एलओसी विभागते. सध्या जो विवाद झाला आहे तो पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात झाला आहे.
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये विवाद निर्माण झालेला भाग हा ब्लॅक टॉप पर्वतापासून जवळ आहे. तसेच हा भाग चुशूलपासून २५ किमी पूर्वेला आहे. ब्लॅक टॉपवर चीनचे नियंत्रण आहे. पण भारतीय लष्कराच्या तेथील उपस्थितीमुळे चीनची झोप उडाली आहे. २९-३० अॉगस्टच्या रात्री चिनी सैन्याने या भागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सैन्याने तो हाणून पाडला.
या भागावर कब्जा करण्यासाठी ५०० हून अधिक चिनी सैनिक आले होते. त्यांच्याकडे दोरखंड आणि चढाईसाठी आवश्यक सामुग्री होती. रात्रीच्या अंधारात ब्लॅक टॉप आणि थाकुंग हाइट्स दरम्यानच्या टेबल टॉप परिसरात चिनी सैन्याने चढाईला सुरुवात केली होती. मात्र तिथे आधीपासून तैनात असलेल्या भारतीय लष्कराने चिनी सैन्याला रोखले आणि माघार घेण्यास भाग पाडले.