रिअल लाइफ 'रँचो'नं लडाखमधील सैनिकांसाठी बनवलं खास टेंट; बोचऱ्या थंडीत आता नो टेन्शन! By मोरेश्वर येरम | Published: February 20, 2021 10:36 PM 2021-02-20T22:36:25+5:30 2021-02-20T22:44:44+5:30
Sonam Wangchuk Made Solar Powered Military Tent: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी लडाखमधील सैनिकांसाठी एक खास टेंट तयार केलं आहे. वांगचुक यांच्या या कामगिरीसाठी सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. नेमकं काय आहे या टेंटमध्ये जाणून घेऊयात... 'थ्री इडिट्स' चित्रपटात 'रँचो' हे पात्र ज्या व्यक्तीवरुन रंगवण्यात आलं होतं ते समाजसेवक सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांनी भारतीय सैनिकांना एक जबरदस्त भेट दिली आहे.
इंजिनिअर सोनम वांगचूक यांनी लडाखच्या बोचऱ्या थंडीत आपल्या जीवाचीही पर्वा न करता देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांसाठी एक खास टेंट तयार केला आहे. या टेंटचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
सौरऊर्जेवर कार्यरत असणारे हे खास टेंट जवानांचं लडाखमधील बोचऱ्या थंडीपासून संरक्षण करणार आहेत. विशेष म्हणजे हे टेंट पूर्णपणे पोर्टेबल असून ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येण्याजोगे आहेत.
लडाखमध्ये वातावरण उणे २० अंश सेल्सियस इतकं जरी असलं तरी या टेंटमध्ये वातावरण १५ अंश सेल्सियस इतकं राखता येतं. यामुळे सैनिकांचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हे टेंट उपयोगी ठरणार आहेत.
सोनम वांगचुक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टेंटचे फोटो ट्विट केले असून टेंटमधील तापमानाची माहिती देणारा एक फोटो देखील त्यांनी ट्विट केला आहे. त्यात टेंटमधील तापमान १५ अंश सेल्सियस इतकं असल्याचं दिसून येतं.
सोनम वांगचुक यांनी तयार केलेले हे टेंट इतके मोठे आहेत की यात किमान १० जवान सहजपणे राहू शकतात. तर या टेंटचं वजन अवघ ३० किलो इतकं आहे. याशिवाय, यात सौरऊर्जेचा वापर केला जाणार असल्यानं ते पर्यावरणपूरक देखील आहेत.