Success Story: डॉक्टरकीचं स्वप्न, राजकारणात एन्ट्री पण बनल्या IAS अधिकारी; ओशिन यांची आगळीवेगळी कहाणी... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 06:41 PM 2022-07-12T18:41:14+5:30 2022-07-12T18:51:34+5:30
UPSC Exam tips, Success Story of Oshin Sharma: पदरात पडलेलं अपयश हेच उद्याच्या यशाची प्रेरणा ठरतं असं म्हटलं जातं. अपयशातून खूप काही शिकण्यासारखं असतं आणि जो शिकतो, धडा घेतो तोच यशस्वी होतो. हिमाचल प्रदेशच्या ओशिन शर्मा याचीही कहाणी प्रेरणादायी आहे. अपयश माणसाला धडा देतं आणि पुढे जाण्याची प्रेरणाही देतं. हिमाचलच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी ओशिन शर्मा यांच्यासाठी हे तंतोतंत लागू पडतं.
ओशिन शर्मा सध्या हिमाचल प्रदेशातील नागर कल्लू येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. हिमाचल प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत ओशिन यांनी 10 वा क्रमांक पटकावला होता.
पदरात अनेकदा अपयश ओशिन शर्मा यांनी सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले, अनेक परीक्षा दिल्या. एकदा त्यांनी निवड नागरी सेवांसाठी देखील होता होता राहिली होती. अवघ्या ५ गुणांच्या फरकामुळे अपयश पदरात पडलं. पण ओशिन यांनी हार मानली नाही आणि 2019 मध्ये त्यांची 'बीडीओ'साठी निवड झाली.
बीडीओ झाल्यानंतरही ओशिन यांनी आपली तयारी सोडली नाही आणि शेवटी दुसऱ्या प्रयत्नात हिमाचल प्रशासकीय सेवेत (एचएएस परीक्षा) त्यांची निवड झाली. या परीक्षेत ओशिन यांनी दहावी रँक पटकावली.
ओशिन शर्मा या सोशल मीडियावर जितक्या सक्रिय आहेत तितक्याच त्या प्रशासकीय कामकाजाबाबतही चर्चेत असतात. इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरही ओशिन यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
असं बदललं स्वप्न ओशिन शर्मा सांगतात की, कुटुंबात शिक्षणासाठी चांगलं वातावरण होतं. ओशिन हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील असून त्या शिमल्यात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार आणि आई कांगडाच्या सेटलमेंट ऑफिसरच्या पीए म्हणून कार्यरत आहेत.
ओशिन सांगतात की त्यांचं आधी डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. नंतर कॉलेजच्या दिवसात त्या विद्यार्थी पातळीवरील राजकारणातही सक्रिय होत्या, पण नंतर त्यांची शिक्षणातील आवड पाहून कुटुंबीयांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर याच क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न बनलं. त्यासाठीची तयारी सुरू केली. ओशिन यांनी पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
तरुणाईला प्रेरणा देण्याचं काम ओशिन शर्मा वैयक्तिक आयुष्यात समाजसेवा आणि तरुणाईला प्रेरणा देण्याचं काम करतात. नुकतंच लाडली फाऊंडेशनने त्यांना ब्रँड अॅम्बेसेडरही बनवलं आहे. त्या IAS परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी टिप्स देखील देत असतात. ओशिन शर्मा म्हणतात की तरुणाईनं अपयशानं निराश न होता अपयशातून शिकलं पाहिजे.
चित्रपटासाठीही झाली होती विचारणा ओशिन शर्मा यांना चित्रपटांच्याही ऑफर आल्या होत्या. पण कुटुंबीयांना पसंत नसल्यामुळे आपण त्या स्वीकारल्या नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे, तर सोशल मीडियातील माझे फोटो पाहून अनेकजण मला चित्रपटात काम करण्याचा सल्ला देतात. पण सध्यातरी माझा तसा कोणताही विचार नाही, असंही ओशिन यांनी स्पष्ट केलं.