Sukma Naxal Attack: लेकाच्या लग्नासाठी बापाची सुरू होती तयारी; नक्षलवाद्यांच्या हल्यात मुलगा शहीद; मन हेलावून टाकणारी घटना By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 06:55 PM 2021-04-05T18:55:10+5:30 2021-04-05T19:07:52+5:30
Sukma Naxal Attack : छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गुटुंरचा रहिवासी असलेले ३२ वर्षीय सीआरपीएफ जवान सखमुरी मुरली कुष्णा शहिद झाले आहेत. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 25 लाखांचा इनाम असलेल्य़ा नक्षलवाद्याला पकडण्यास गेलेल्या 200 सुरक्षा जवानांच्या एका तुकडीला घेरून नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला (Sukma Naxal Attack) केला. यामध्ये 24 जवान शहीद झाले असून एक जवान बेपत्ता झाला आहे. हा बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा फोन नक्षलवाद्यांनी (Naxalite) एका पत्रकाराला करून अट ठेवल्याने खळबळ उडाली आहे. (Chhattisgarh: 24 jawans killed, 31 injured in anti-Naxals operation in Sukma. One missing Cobra commando in Naxal leader's Custody.)
अशात आई वडील आपल्या ज्या मुलाचे हात पिवळे करण्याची स्वप्न रंगवत होते. त्याच लेकाच्या शहीद होण्याची बातमी मिळताच सगळ्यांना मोठा धक्का बसला. ज्या ठिकाणी लग्नाची तयारी केली जात होती. ते कुटुंब आता मुलाच्या शेवटच्या दर्शनासाठी त्यांच पार्थिव घरी येण्याची वाट पाहत होते. गावातील लोकांकडून अंत्यसंस्कारांची तयारी केली जात होती.
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गुटुंरचा रहिवासी असलेले ३२ वर्षीय सीआरपीएफ जवान सखमुरी मुरली कुष्णा शहिद झाले आहेत. मुरली कृष्णा हे सीआरपीएफच्या तुकडीचा हिस्सा होते. त्यांनी बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी लढून देशासाठी आपले प्राण गमावले. मुरली कृष्णा यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण गावात शुकशुकाट पसरला होता.
२२ मे ला मुरली कृष्णा यांचा विवाह पार पडणार होता. त्यांचे वडील सखमुरी रवींद्र, आई विजयकुमारी त्यांच्या लग्नाची तयारी करत होती. ६ वर्षांपूर्वी मुरली कृष्णा सीआरपीएमध्ये सामिल झाले होते. कोबरा-२१० विंगमध्ये ते काम करत होते. त्यांच्या अचानकपणे जाण्यानं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. त्यांची आई बेशुद्धावस्थेत असून घरातील इतर मंडळी त्याच्या आठवणीत रडत आहे.
या मोहिमेसाठी सुरक्षा दलाच्या काही टीम तयार करण्यात आल्या होत्या. घनदाट जंगलात त्यांना कोपरान कोपरा शोधायचा होता. मात्र, नक्षलवादी त्यांची वाटच पाहत होते. अनेक तुकड्यांपैकी एका तुकडीला नक्षलवाद्यानी तीन बाजुंनी घेरले आणि हिडमाच्या बटालियनने हल्ला केला. यामध्ये हे जवान शहीद झाले.
हिडमाची बटालियन डोंगररांगांतून फायरिंग करत होती. यामुळे खाली असलेले जवान सहज लक्ष्य ठरले. तिन्ही बाजुंनी घेरलेल्या जवानांनी त्या ही परिस्थितीत हिडमाच्या मोक्याच्या जागी लपलेल्या आणि हल्ला करत असलेल्या नक्षलवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिले.यामध्ये नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलीस सुत्रांनी सांगितले की, घटनास्थळवरून 4 ट्रॅक्टरमध्ये भरून नक्षलवाद्यांनी त्यांच्या साथीदारांचे मृतदेह नेले आहेत. काही दिवसांपूर्वीच हिडमाने पोलिसांना आव्हान दिले होते.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईसाठी शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आली होती. विजापूर जिल्ह्यातील तर्रेम, उसूर व पामेड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनापा व नरसपुरम येथील कारवाईत सुमारे दोन हजार सैनिक सहभागी झाले होते.
शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेली चकमत तब्बल तीन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू होती अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यानं दिलं. यापूर्वी २३ मार्च रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूर जिल्ह्यात स्फोट करून बस उडवली होती. यात बसमध्ये असलेले डीआरजीचे पाच जवान शहीद झाले होते.