विजय मल्ल्याच्या मुलांना चुकवावे लागणार ३१८ कोटी? नेमका घोटाळा कुणी केला? जाणून घ्या सोप्या शब्दात... By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 01:29 PM 2022-07-12T13:29:54+5:30 2022-07-12T13:38:34+5:30
बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला सुप्रीम कोर्टानं काल शिक्षा सुनावली. ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच ४ आठवड्यात व्याजासह ४० मिलियन डॉलर परत करण्याचेही आदेश दिले आहेत. परदेशात पळालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या (Vijay Mallya) याला सुप्रीम कोर्टानं चार महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसंच २ हजारांचा दंड ठोठावला. तसंच दंड भरला नाही तर आणखी दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
विजय मल्ल्या २०१६ सालापासून लंडनमध्ये असून त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल अवमान याचिका प्रकरणाचा आहे. हे प्रकरण ४० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३१८ कोटी रुपयांचं आहे. मल्ल्यानं ही रक्कम आपल्या तीन मुलांच्या नावे पाठवली होती. कोर्टानं ही रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आता ही रक्कम मल्ल्या यांच्या तीन मुलांना चुकती करावी लागणार आहे का? कोर्टानं आपल्या आदेशात नेमकं काय म्हटलंय हे समजून घेऊयात...
मल्ल्यानं जे काही केलं त्याचा त्याला अजिबात पश्चाताप वाटत नाही आणि सुनावणीवेळी देखील उपस्थित राहिला नाही. कायद्याचं महत्व टिकून राहण्यासाठी त्याला शिक्षा ठोठावणं गरजेचं आहे असं कोर्टानं दिलेल्या निकालात नमूद करण्यात आलं आहे. कोर्टानं मल्ल्याला चार आठवड्यांच्या आत ४० मिलियन डॉलर परत करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच ही रक्कम ८ टक्के व्याजासह परत करावी लागणार आहे. असं न केल्यास मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.
संपूर्ण प्रकरण नेमकं काय? देशातील बँकांना ९ हजार कोटींहून अधिक रुपयांचा चूना लावल्याचा आरोप विजय मल्ल्यावर आहे. मार्च २०१६ पासून मल्ल्या लंडनमध्ये आहे आणि त्याला भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. २०१७ मध्ये बँकांच्या कंसोर्शियमनं सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करत मल्ल्याच्याविरोधात अवमान खटला दाखल करुन त्यावर सुनावणीची मागणी केली होती.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्त्वाखालील कंसोर्शियमनं केलेल्या आरोपानुसार मल्ल्यानं आपल्या तीन मुलांच्या खात्यात ४० मिलियन डॉलर ट्रान्सफर केले होते. हे कोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन असल्याचं बँकांचं म्हणणं आहे.
मे २०१७ मध्ये बँकांनी याविरोधात कोर्टात धाव घेतली आणि याप्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर कारवाई सुरू झाली. कोर्टानं मल्ल्याला कोर्टासमोर उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. पण एकाही सुनावणीला मल्ल्या उपस्थित राहू शकला नाही. अखेर १० फेब्रुवारी रोजी कोर्टानं मल्ल्याला दोन आठवड्यांच्या आत कोर्टासमोर हजर राहण्याचा इशारा दिला होता. पण त्यानंतर मल्ल्या परतला नाही.
कर्जाच्या वसुलीसाठी मल्ल्यावर संपत्ती आणि कोणत्याही खासगी मालमत्ता विक्रीवर बंधन कोर्टानं घातलं होतं. तरीही मल्ल्यानं आपली काही संपत्ती ७५ मिलियन डॉलरला विकली आणि आपल्या तीन मुलांच्या नावावर एक ट्रस्ट तयार करुन त्यात पैसे ट्रान्सफर केले होते. कोर्टात सुनावणीवेळी मल्ल्याच्या वकिलांकडून सदर संपत्ती त्याची नसल्याचा दावा करण्यात आला होता. पण कोर्टानं हा दावा फेटाळून लावला होता.
कुठून पाठवला होता इतका पैसा? बँकांच्या कंसोर्शियमनं मल्ल्यावर तथ्य लपवल्याचा आणि कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. मल्याला ब्रिटनच्या एका ऑफशोअर कंपनी असलेल्या डियाजियोकडून ४० मिलियन डॉलर मिळाले होते. ही रक्कम त्यानं आपल्या तीन मुलांच्या नावानं ट्रान्सफर केली होती, असा आरोप बँकांनी केला आहे. याचिकेतील माहितीनुसार मल्ल्यानं त्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या आणि मुलगी लीना व तान्या मल्ल्या यांच्या नावानं प्रत्येकी १३ मिलियन डॉलर ट्रान्सफर केले होते.
मल्ल्याच्या तीन मुलांना परतफेड करावी लागणार? सुप्रीम कोर्टानं मल्ल्याच्या तीन मुलांना ४० मिलियन डॉलर चार आठवड्यात बँकांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. सिद्धार्थ, लीना आणि तान्या ८ टक्के व्याजासह ही रक्कम परत करतील असं कोर्टानं म्हटलं आहे. तसंच रक्कम परत करण्यास असमर्थता दाखवल्यास वसुलीसाठी कोणतीही कारवाई केली जाऊ शकते. यात संपत्तीवर जप्तीचा पर्याय देखील उपलब्ध असल्याचं कोर्टानं नमूद केलं आहे.