Taj Mahal Controversy And Diya Kumari: ताजमहाल वाद: कोण आहेत राजकुमारी दीया कुमारी सिंह? ‘असा’ आहे राजकीय प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:36 PM 2022-05-12T12:36:22+5:30 2022-05-12T12:43:24+5:30
Taj Mahal Controversy: जयपूर घराण्याच्या राजकुमारी आणि भाजप खासदार दीया कुमारी सिंह यांनी ताजमहालची मालमत्ता त्यांची असल्याचा दावा केल्याने या वादाला नवे वळण लागल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ताजमहाल मकबरा आहे की मंदिर, असा वाद पुन्हा उफाळून आला आहे. याचे कारण म्हणजे भाजप नेते रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात दाखल केलेली याचिका. (Taj Mahal Controversy)
या याचिकेत रजनीश सिंह यांनी ताजमहालमधील २२ खोल्या खुल्या करण्याची मागणी केली आहे. या २२ खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी एएसआयने या खोल्या बंद केल्या होत्या. (Taj Mahal 22 Rooms Mystery)
ताजमहाल ज्या ठिकाणी आहे ती जयपूरचे राजा मानसिंग यांची मालमत्ता होती. शहाजहानने ताजमहालच्या बदल्यात मानसिंगचा नातू राजा जयसिंह याला चार इमारती दिल्या होत्या, असे सांगितले जाते.
आता जयपूर घराण्याच्या राजकुमारी आणि भाजप खासदार असलेल्या दीया कुमारी सिंह यांनी ताजमहालची मालमत्ता त्यांच्या मालकीची असल्याचा दावा केले आहे. यावरून आता या वादाला नवीन वळण मिळाले आहे. मात्र, यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्यासही सुरुवात झाली आहे.
आग्रा येथील ताजमहालावर जयपूरच्या माजी राजघराण्याने आपला दावा सांगितला आहे. जयपूरच्या माजी राजघराण्याच्या प्रिंसेस आणि भाजपाच्या खासदार दीया कुमारी यांनी ताहमहाल ही आमची प्रॉपर्टी आहे. तो आमच्या कुटुंबाच्या पॅलेसच्या मालमत्तेवर उभा आहे.
आमच्याकडे अशी कागदपत्रे आहेत, जी ताजमहाल हा जयपुरच्या माजी राजघराण्याचा एक पॅलेस होता, याला दुजोरा देतात. या पॅलेसवर पुढे शाहजहानने कब्जा केला. बंद खोल्या उघडून ताजमहाल हा आधी काय होता, याचा शोध घेतला गेला पाहिजे.
ताजमहालमधील खोल्या उघडल्या पाहिजेत. काही भाग दीर्घकाळापासून उघडलेले नाहीत. त्याची निश्चितच चौकशी झाली पाहिजे, तसेच ते उघडले पाहिजेत. त्यामुळे तिथे काय होते काय नव्हते हे सर्वांसमोर येईल. या सर्व दाव्यांची योग्य चौकशी झाल्यावरच याबाबतची निश्चित माहिती समोर येईल, असे त्या म्हणाल्या.
दीया कुमारी या जयपूरच्या राजघराण्यातील आहेत. मुघल सम्राट अकबराच्या नवरत्नांमध्ये समाविष्ट असलेले मानसिंग हे त्यांचे राजघराणे होते. या कुटुंबात माजी महाराज सवाई भवानी सिंह यांचा जन्म झाला, त्यांच्या पत्नीचे नाव पद्मिनी देवी आहे.
जयपूरचे राजघराणे स्वतःला भगवान रामाचे वंशज मानतात. असे म्हटले जाते की, जयपूरचे महाराज भवानी सिंह हे भगवान श्रीरामाचे पुत्र कुश यांचे ३०९ वे वंशज होते. महाराजा सवाई भवानी सिंह हे १९७१ पर्यंत जयपूरचे महाराज होते. दीया कुमारी सिंह भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांची एकुलती एक कन्या आहे.
दीया कुमारी सिंह यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्ली आणि जयपूर येथे घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या लंडनला गेल्या. भवानी सिंह यांना मुलगा नसल्याने त्यांनी दीया कुमारी सिंह यांना २०११ मध्ये आपला वारस घोषित केले.
दीया कुमारी यांनी १९९७ मध्ये नरेंद्र सिंह यांच्याशी गुपचूप विवाह केला. या विवाहाची मोठी चर्चा झाली. नरेंद्र सिंह यांचा कोणत्या राजघराण्याशी संबंध नाही. या दोघांना तीन अपत्ये आहेत. मोठ्या मुलाचे नाव पद्मनाभ असून, धाकट्या मुलाचे नाव लक्ष्यराज सिंह आहे. त्यांना एक कन्यारत्न असून, गौरवी असे तिचे नाव आहे.
दीया कुमारी सिंह यांनी आपल्या आज्जीच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला. भाजपच्या तिकिटावर दीया सिंह सवाई माधवपूर येथून आमदार बनल्या. आताच्या घडीला त्या राजसमंद येथून लोकसभा खासदार आहेत.
दरम्यान, ताजमहालबाबतचा हा वाद नवा नाही. ताजमहालापूर्वी येथे शिवमंदिर होते, असा दावा हिंदू संघटना करत आहेत. जे 'तेजो महालय' म्हणून ओळखले जात होते. ताजमहालचे 'तेजो महालय' हे नाव प्रथम मराठी पुस्तकातून आले. इंदूरमध्ये जन्मलेल्या ओक यांच्याकडे एम.ए.ची पदवी होती. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्येही ते दीर्घकाळ प्राध्यापक होते.
या पुस्तकारचे लेखक मराठमोळे इतिहासकार पीएन ओक आहेत. पीएन ओक यांनी १९६० ते ७० च्या दशकात ताजमहाल, फतेहपूर सिक्री आणि लाल किल्ल्याबद्दल अनेक पुस्तके लिहिली. मात्र, या पुस्तकांवरून अनेक वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. पीएन ओक आपल्या पुस्तकात म्हणतात की, ताजमहालचे नाव पूर्वी शिवमंदिराच्या नावावरून 'तेजो महालय' असे ठेवण्यात आले होते.
पीएन ओक यांनी आपल्या 'ताजमहाल : द ट्रू स्टोरी' या पुस्तकात ताजमहालाऐवजी शिवमंदिर असावे, असे म्हटले होते. ओक यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की, हे स्मारक ११५५ मध्ये बांधले गेले होते. म्हणजेच मुघल राजवटीच्या दशकांपूर्वीपासूनच ही इमारत अस्तित्वात होती.