पैलवान, शिक्षक ते नेताजी! संघर्षमय होतं मुलायम सिंह यादव यांचं जीवन, एकेकाळी पंतप्रधानपदासाठीही होती दावेदारी By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 11:23 AM 2022-10-10T11:23:12+5:30 2022-10-10T11:35:23+5:30
Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांचं आज निधन झालं गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिक्षकापासून सुरुवात करत नेताजी बनलेल्या मुलायम सिंह यादव यांच जीवन अनेक संघर्षमय चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी. समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांचं आज निधन झालं गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिक्षकापासून सुरुवात करत नेताजी बनलेल्या मुलायम सिंह यादव यांच जीवन अनेक संघर्षमय चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी.
मुलायम सिंह यादव यांचा जन्म इटावा जिल्ह्यातील सैफई गावामध्ये २२ नोव्हेंबर १९३९ रोजी एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांना कुस्तीची आवड होती. राजकारणात येण्यापूर्वी मुलायम सिंह यादव हे शिक्षक होते. एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलायम सिंह यादव यांना सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र या आव्हानांचा सामना त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने करता येत असे. ते मुळात एक शिक्षक होते मात्र शिक्षण क्षेत्र सोडून ते राजकारणात आले आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदापासून ते केंद्रात संरक्षण मंत्रीपदापर्यंत अनेक पदे भुषवली.
१९६७ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी मुलायम सिंह यादव संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर पहिल्यांदा जसवंतनगर क्षेत्रातून विधानसभा सदस्य बनले आणि १९७७ मध्ये पहिल्यांदा राज्यमंत्री बनले. १९८० मध्ये उत्तर प्रदेशात लोकदलाचे अध्यक्ष बनले. लोहिया आंदोलनात आघाडीवर राहून सहभागी होणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी ४ ऑक्टोबर १९९२ रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली.
सर्वसामान्य लोकांमध्ये मुलायम सिंह यादव यांची ओळख भूमीपुत्र, शेतकरी नेते यासारख्या नावाने ओळखले जात. त्यांचं गावातील लोकांवर विशेष लक्ष होतं. त्यांना चाहते नेताजी या नावाने बोलावत. मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं.
मुलायम सिंह यादव यांनी देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सन १९९६ मध्ये मुलायम सिंह यादव मैनपुरी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. १९९८ मध्ये ते सरकार कोसळले. दरम्यान, १९९९ मध्ये त्यांनी संभल मतदारसंघातून विजय मिळवत लोकसभा गाठली.
दरम्यान, यावर्षी जुलै महिन्यात मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन झाले होते. तर त्यांच्या पहिल्या पत्नी आणि अखिलेश यादव यांच्या मातोश्री मालती देवी २००३ मध्ये निधन झाले होते. साधना गुप्ता आणि मालती देवी यांचे पुत्र प्रतीक यादव आहेत.