'ठाकरे सरकार माफियांची टोळी झालीय' By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:40 PM 2021-03-14T16:40:49+5:30 2021-03-14T16:50:45+5:30
मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
सचिन वाझे प्रकरणावरुन भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. तसेच, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केलीय.
सचिन वाझेंवरील कारवाईसाठी विधानसभेत आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadanvis reaction on Sachin Vaze arrest ) वाझेंवरील कारवाई ही केवळ सुरुवात आहे, या प्रकरणात अजून माहिती समोर येऊ शकते, अशी शक्यता फडणवीस यांनी वर्तवली आहे.
या प्रकरणात सचिन वाझेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला. मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे हा लादेन आहे का असा प्रतिप्रश्न करत वकिली करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणात एनआयएला अनेक पुरावे मिळाले आहेत.
खरंतर हा या प्रकरणाचा एकच भाग आहे. दुसरा भाग समोर यायचा आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणामध्येही मोठे पुरावे आणि धागेदोरे एनआयएला मिळाले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितलं
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर ५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. याप्रकरणी एनआयएने शनिवारी रात्री ११.५० वाजता सचिन वाझेंना अटक केली आहे. शनिवारी १३ तास NIA कडून सचिन वाझे यांची झाडाझडती घेण्यात आली.
वाझेंना रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात सुट्टीकालीन खंडपीठासमोर दाखल करण्यात आले. कोर्टाकडे NIAने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, सचिन वाझे यांना 10 दिवसाची NIA कोठडी कोर्टाने सुनावली आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे लाडके सचिन वाझे अखेर जेलमध्ये गेले. त्यांना पाठीशी घालताना, २४ तासांत अटकेऐवजी बदली करणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता जाब द्यावा लागेल, असे भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी म्हटलंय.
ठाकरे सरकार माफियांची टोळी झालीय, अशी घणाघाती टीकाही किरीट सोमैय्या यांनी केली आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन भाजपा नेते आक्रमक झाले असून महाविकास आघाडी सरकारला जाब विचारत आहेत.
आमदार राम कदम यांनी सचिन वाझेंच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. तर, राम कदम यांच्या मागणीला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे, असे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय.
ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का हा जो शब्द वापरला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे ही स्पष्ट मागणी आहे" असं प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असे त्यांना वाटत नाही का? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.