PM Modi In Punjab: "एअरपोर्टवर जीवंत पोहोचलो, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांगा", PM मोदींची परखड टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 04:28 PM2022-01-05T16:28:08+5:302022-01-05T16:38:45+5:30

PM Modi In Punjab: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत आज एक मोठी चूक झाली. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटानं मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. त्यानंतर काय घडलं वाचा...

PM Modi In Punjab: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत आज एक मोठी चूक झाली. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटानं मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. एका उड्डाणपुलावर जवळपास १५ ते २० मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खोचक टीका करत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर निशाणा साधला. एअरपोर्टवर जिंवत पोहोचू शकलो याबाबत मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांग, असं पंतप्रधान मोदी विमानतळावरील अधिकाऱ्याला म्हणाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना एक संदेश दिला. यात त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर निशाणा साधला.

"मी एअरपोर्टवर जिंवत पोहोचू शकलो याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांगा", असं पंतप्रधान मोदी विमानतळावरील अधिकाऱ्यांना म्हणाले, अशी माहिती भटिंडा एअरपोर्टच्या व्यवस्थापनानं दिल्याचं एएनआयनं म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं बळ पंजाब-हरियाणातून मिळालं होतं. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर होते. बुधवारी पंजाबच्या फिरोजपूर इथं त्यांची रॅली होती. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

सुरुवातीला रॅली रद्द होण्यामागे पावसाचं कारण देण्यात आले. परंतु आता रॅली रद्द होण्यामागे सुरक्षेचं कारण देण्यात आले आहे. गृह मंत्रालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले असून पंजाब सरकारकडे उत्तर मागितलं आहे.

पंजाबमध्ये भाजपा आक्रमक झाली असून त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा राजीनामा मागितला आहे. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवदेनात म्हटलंय की, पंतप्रधान मोदी सकाळी भटिंडाला पोहचले होते. त्याठिकाणाहून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते.

पाऊस आणि खराब वातावरणामुळे पंतप्रधान मोदींना २० मिनिटं वाट पाहावी लागली. त्यानंतरही वातावरण तसेच राहिल्याने रस्ते मार्गाने मोदींनी जाण्याचा निर्णय घेतला. रस्ते मार्गाने जाण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार होता. त्याबाबत पंजाब पोलिसांचे डीजीपी यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मंजुरी घेतली.

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा राष्ट्रीय स्मारकाच्या ३० किमी अंतरावर होता. तेव्हा रस्त्यात असणाऱ्या उड्डाणपूलावर मोदींचा ताफा पोहचला तेव्हा अचानक रस्त्यावर शेतकऱ्यांनी ताफा रोखला. या उड्डाणपूलावर जवळपास १५-२० मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयाने सांगितले.