The Kashmir Files: ‘काश्मीर फाइल्स’मधील बिट्टा कराटे आता कुठे आहे?; पंडितांच्या हत्येचा गुन्हेगार फारूख अहमदची संपूर्ण कहानी, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 12:28 PM2022-03-19T12:28:18+5:302022-03-19T12:32:22+5:30

‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा पाहून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो तो म्हणजे बिट्टा कराटेचं पुढे काय झालं? सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याचा एन्काउंटर केला की तो पाकिस्तानात पळून गेला? का आजही बिट्टा कराटे त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा जेलमध्ये राहून भोगत आहे?

बिट्टा कराटे(Bitta Karate) हा तोच इसम आहे ज्याचं नाव फारूख अहमद डर(Farooq Ahmed Dar) असून त्याला काश्मीरी पंडितांसाठी कसाई म्हणून ओळखलं जायचं. त्यानंतर बिट्टाने राजकीय मार्गावर प्रवेश केला आणि शांततेच्या बाता करू लागला. काश्मीर खोऱ्यात हत्यार उचलण्यामध्ये सर्वात आधी यादीत बिट्टाचं नाव येते.

जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट(JKLF) त सहभागी झाल्यानंतर बिट्टा कराटेने काश्मीर पंडितांचा रक्तपात घडवला. पाकिस्तान व्याप्त काश्मीरात जाऊन त्याने दहशतवादाचं प्रशिक्षण घेतले. १९९० मध्ये काश्मीर खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झाले त्यामागे बिट्टाची प्रचंड दहशत असल्याचं बोललं जातं.

बिट्टाने काश्मीर पंडितांची हत्या केली आणि त्याचे ऑडर्स टॉप कमांडर्सकडून मिळत असल्याची कबुली कॅमेऱ्यासमोर दिली आहे. फारूख अहमदला त्याचे मित्र बिट्टा बोलवत असे. दहशतवादी बनण्याआधी तो कराटेतील खेळाडू होता. त्यामुळे दहशतवादी दुनियेत त्याला बिट्टा कराटे असं नाव पडलं.

काश्मीर खोऱ्यात बिट्टा कराटेला दहशत पसरवण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. १९८८ मध्ये LOC पार करून त्याने पीओकेमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग घेतले. त्यानंतर काश्मीरात परतून त्याने हिंदुविरोधी वातावरण तयार केले. बिट्टाने एकएक करून काश्मीर पंडितांना निशाणा बनवलं. खोऱ्यात हिंदूंची कत्तल होत असताना बिट्टा JKLF चा एरिया कमांडर होता.

बिट्टाने आधी त्याचा मित्र आणि तरुण व्यापारी सतीशकुमार टिक्कूची हत्या केली. टिक्कूला त्याच्या घरासमोर गोळ्या घालून ठार करण्यात आले. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, बिट्टा श्रीनगरच्या रस्त्यांवर फिरत असे आणि काश्मिरी हिंदुंना पाहताच त्यांना पिस्तूल काढून मारायचा.

१९९१ च्या एका टीव्ही मुलाखतीत त्याने '२० हून अधिक काश्मिरी हिंदूंची हत्या' केल्याची कबुली दिली. ३०-४० पेक्षा जास्त पंडित मारले गेले असावेत, असेही तो म्हणाला. काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पळ काढल्यानंतर २२ जानेवारी १९९० रोजी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे याला श्रीनगरमधून अटक केली.

त्यावेळी त्याच्यावर २० खटले चालले होते. बिट्टा याने पुढील १६ वर्षे कोठडीत घालवली. २००६ मध्ये त्याला टाडा कोर्टातून जामीन मिळाला होता. बिट्टाची सुटका करताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, फिर्यादी पक्ष पुरेसे पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले आहेत.

सुटका झाल्यानंतर बिट्टा गुरुबाजार येथे पोहोचल्यावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. बिट्टाने आता त्याचा मार्ग बदलला आहे. त्याने राजकारणात प्रवेश केला. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेला त्याचा पाठिंबा होता.

खोऱ्यात रक्त सांडणाऱ्या काश्मीरचा प्रश्न सोडवण्याचे आवाहन दोन्ही देशांना करू लागला. काही वर्षांतच तो JKLF चा प्रमुख बनला. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर एजन्सींनी दहशतवादी फंडिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली. JKLF वर बंदी घालण्यात आली होती.

खोऱ्यात दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून आपल्याला आणि इतर प्रमुख फुटीरतावादी नेत्यांना भरपूर पैसे मिळाल्याची कबुली देताना बिट्टा कॅमेऱ्यात पकडला गेला. बिट्टा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) रडारखाली आला. मार्चमध्ये एनआयएने बिट्टा कराटेसह अनेक फुटीरतावाद्यांना अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.