भारतातलं असं एकमेव राज्य ज्याला राजधानीच नाही; तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 01:04 PM2024-07-12T13:04:22+5:302024-07-12T13:23:00+5:30

भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. सध्या देशातील २७ राज्यांची राजधानी अस्तित्वात आहे. मात्र भारतात एक असे राज्य आहे जे राजधानीशिवाय चालत आहे.

देशात राजधानी नसणारे आंध्र प्रदेश हे राज्य आहे. इतिहासात प्रथमच आंध्र प्रदेश असे राज्य आहे ज्याची सध्या कोणतीही राजधानी नाही.

२०१४ मध्ये आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर घेतलेल्या राजकीय आणि प्रशासकीय निर्णयांमुळे ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर तेलंगणा राज्य अस्तित्वात आले. त्यावेळी दोन्ही राज्यांची राजधानी हैदराबाद ही एकच होती.

त्यावेळी हैदराबादला १० वर्षांच्या कालावधीसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी घोषित करण्यात आलं होतं. हा १० वर्षांचा कालावधी २ जून २०२४ रोजी संपला.

२ जूनपासून, हैदराबाद आता तेलंगणाची अधिकृत राजधानी बनली आहे, परंतु आंध्र प्रदेश आता राजधानी नसलेले राज्य बनले. गेल्या १० वर्षात आंध्र प्रदेशला स्वतःची राजधानी बनवायची होती, मात्र आजपर्यंत यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

राज्याच्या मध्यभागी कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या अमरावतीला त्यावेळचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्याच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशची राजधानी घोषित केले होते.

आंध्र प्रदेश विकसित करण्यासाठी नायडूंनी शेतकऱ्यांकडून ३३,००० एकर जमीन खरेदी केली आणि शहर वसवण्यासाठी सिंगापूरस्थित कंपन्यांशी संपर्क साधला. मात्र २०१९ मध्ये, नायडूंचा पराभव झाला आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांची वायएसआरसीपी सत्तेवर आली.

वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सर्व प्रकल्प थांबवले आणि बजेट कमी केले, ज्यामुळे सिंगापूरच्या कंपन्यांना प्रकल्पातून बाहेर पडल्या. रेड्डी यांनी त्याऐवजी तीन शहरांना राजधानी करण्याचे ठरवलं. मात्र हा मुद्दा कायदेशीर अडचणीत सापडला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचला.

आता आंध्र प्रदेशात नायडू हे पुन्हा सत्तेवर आले असून त्यांनी अमरावती ही राज्याची राजधानी असेल याची घोषणा केलीय. विशाखापट्टणमला आर्थिक राजधानी आणि प्रगत विशेष शहर म्हणून विकसित केले जाईल, असेही नायडू म्हणाले.

अमरावतीच्या पुनर्बांधणीसाठी आंध्र प्रदेशनेही केंद्राकडे सहकार्य मागितले आहे. पण तसे होईपर्यंत आंध्र प्रदेश तांत्रिकदृष्ट्या स्वतःच्या राजधानीशिवाय असणार आहे.

अमरावतीच्या पुनर्बांधणीसाठी आंध्र प्रदेशनेही केंद्राकडे सहकार्य मागितले आहे. पण तसे होईपर्यंत आंध्र प्रदेश तांत्रिकदृष्ट्या स्वतःच्या राजधानीशिवाय असणार आहे.