ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:21 PM 2024-09-24T16:21:00+5:30 2024-09-24T16:29:49+5:30
Tirupati Balaji Mandir: प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये सापलेल्या भेसळीमुळे सध्या भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेलं तिरुपती बालाजी मंदिर चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज आपण तिरुपती मंदिरातील धार्मिक व्यवस्थापन पाहणाऱ्या येथील चार शक्तिशाली पुजारी कटुंबांबाबत जाणून घेऊयात. प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये सापलेल्या भेसळीमुळे सध्या भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेलं तिरुपती बालाजी मंदिर चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज आपण तिरुपती मंदिरातील धार्मिक व्यवस्थापन पाहणाऱ्या येथील चार शक्तिशाली पुजारी कटुंबांबाबत जाणून घेऊयात.
तिरुपती बालाजी मंदिरामध्ये मंदिरामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. हे सर्व धार्मिक विधी याच चार कुटुंबातील व्यक्तींकडून केले जातात. तिरुपती मंदिरामध्ये एकूण ५८ पुजारी आहेत. मात्र त्यामधील २३ पुजारी हे परंपरेने येथे नियुक्त केले जातात. तसेच येथे पूजेचा मान असलेली ही चारही कुटुंब श्रीमंत आणि प्रतिष्ठित मानली जातात. या पुजारी कुटुंबांची नावं पैडिपल्ली, गोल्लापल्ली, पेद्दिन्ती आणि तिरुपतम्मा अशी आहेत. मागच्या अनेक पिढ्यांपासून त्यांच्याकडे तिरुमाला येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजा करण्याचा मान आहे.
तिरुपती येथील मुख्य पुजारी हे वंशपरंपरागत पद्धतीने नियुक्त होतात. त्यांना प्रधान अर्चक असं म्हटलं जातं. त्यांना दरमहा ८२ हजार एवढं मानधन मिळतं. त्याबरोबरच इतर सुविधाही मिळतात. दुसरे मुख्य पुजारीसुद्धा वंशपरंपरागत पद्धतीने नियुक्त होतात, त्यांना दरमहा ५२ हजार रुपये एवढं वेतन मिळतं. तर गैरवंशपरंपरात पुजाऱ्यांना ३० ते ६० हजार रुपयांपर्यंतचं वेतन मिळतं.
तिरुमाला तिरुपती देवस्थानममधील पुजाऱ्यांना विशेषकरून वंशपरंपरागत पुजाऱ्यांना तिरुमाला मंदिरातील दर्शनासाठी एका निश्चित संख्येमध्ये व्हीआयपी पास मिळतात. त्या माध्यमातून ते त्यांच्या निकटवर्तीयांना तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी नेऊ शकतात.
तिरुपती मंदिरामधील मुख्य पुजारी असलेल्या पेडिपल्ली, गोल्लापल्ली, पेद्दिन्ती आणि तिरुपतम्मा कुटुंबातील सदस्य हे तिरुपती मंदिरातील पहिले पुजारी गोपीनाथाचार्युलू यांचे वंशज आहेत. ते मंदिरामधील अनुष्ठानांबाबतची एक संहिता वैखानस आगम याचे तज्ज्ञ होते. वैखानस आगम श्री विष्णूंच्या मंदिरातील पूजेच्या दोन परंपरांपैकी एक आहे.
या कुटुंबांमधील लोकांना अर्चक, मीरासी परिवाक किंवा वंशपरंपरागत पुजारी म्हणून ओळखलं जातं. सुमारे २ हजार वर्षांपासून ही कुटुंबं तिरुमाला तिरुपती आणि गोविंदराज स्वामी मंदिराशी संबंधित आहेत. या कुटुंबातील सदस्यांना पारंपरिकपणे मंदिरामधील विधी आणि रीतीरिवाजांचे संरक्षक म्हणून ओळखलं जातं. या मंडळींकडून मंदिरातील प्रथांचं नियंत्रण करणाऱ्या आगम श्रास्त्रांचं पालन सुनिश्चित केलं जातं.
सध्या ए. वेणुगोपाल दीक्षितुलू हे तिरुपती मंदिरातील मुख्य अर्चक म्हणजेच मुख्य पुजारी आहेत. ते गोल्लापल्ली या वंशपरंपरागत कुटुंबातील आहेत. ए. वेणुगोपाल दीक्षितुलू हे २०१८ मध्ये मुख्य पुजारी बनले होते. तत्पूर्वी डॉ. ए. व्ही. रमन्ना दीक्षातुलू हे मुख्य पुजारी होते. तेही मंजिरांमधील मुख्य अनुष्ठानांमधील तज्ज्ञ मानले जात असत.
निश्चित माहिती नसली तरी या कुटुंबांना तिरुमाला तिरुपती देवस्थानमच्या एकूण उत्पन्नामधील एक निश्चित हिस्सा मिळतो, असा दावा केला जातो. एवढंच नाही तर या चारही कुटुंबातील लोक हे टीटीडीमध्ये प्रभावशाली पदावंर आहेत. तसेच त्यांची संपत्ती कोट्यवधी रुपयांची असल्याचेही सांगण्यात येते.