राम मंदिर आंदोलनातील हे बडे नेते यावेळी दिसणार नाहीत लोकसभेच्या आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 07:48 PM2019-04-01T19:48:41+5:302019-04-01T20:18:03+5:30

भाजपाच्या राजकीय वाटचालीत राम मंदिर आंदोलन हा मैलाचा दगड ठरला होता. या आंदोलनाच्या जोरावर भाजपाने देशपातळीवर झेप घेतली होती. तसेच या आंदोलनातील नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली होती. मात्र यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिर आंदोलनातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना भाजपाने उमेदवारी दिलेली नाही. अशा बड्या नेत्यांचा घेतलेला हा आढावा.

लालकृष्ण अडवाणी - भाजपाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना वाढत्या वयामुळे यावेळी पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिरासाठी काढलेली रथयात्रा आणि आक्रमक भाषणांचा 90च्या दशकात भाजपाला मोठा फायदा झाला होता. तसेच पक्ष पहिल्या स्थानापर्यंत पोहोचला होता.

मुरली मनोहर जोशी - राम मंदिर आंदोलनाशी संबंधित असलेले अन्य एक ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. राम मंदिरासाठी बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा मुरली मनोहर जोशींकडे भाजपाची धुरा होती.

उमा भारती - राम मंदिर आंदोलनामध्ये उमा भारती यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती. त्यांनाही भाजपाने यावेळी उमेदवारी नाकारली आहे. गेल्या निवडणुकीत उमा भारती या झाशी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.

विनय कटियार - राम मंदिर आंदोलनातील एक आक्रमक नेते विनय कटिया यांनाही यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. विनय कटियार हे अयोध्येचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या फैजाबाद येथून तीन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

कलराज मिश्र - कलराज मिश्र यांनीही अयोध्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र त्यांनाही यावेळी उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे संकेत पक्षाने दिले होते. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.

कल्याण सिंह - बाबरी मशिदीचे पतन झाले तेव्हा भाजपाचे नेते कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. कल्याण सिंह यांनी बाबरी मशिदीच्या पतनावेळी परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली नसल्याचा आरोप झाला होता. कल्याण सिंह सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत.

या बड्या नेत्यांशिवाय राम मंदिर आंदोलनाशी संबंधित स्वामी चिन्मयानंद, साध्वी ऋतुंभरा, रामविलास वेदांती यांनाही यावेळी भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही.