प्रेरणादायी! लग्नात कॅटरिंग बॉयचं काम करायचा; आज आहे 'मोठा सेलिब्रिटी', ओळखलंत का तुम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 09:57 AM2023-05-31T09:57:54+5:302023-05-31T10:03:44+5:30

इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. सुरेश पिल्लई यांनी एक कॅटरिंग सर्व्हिस बॉय ते सेलिब्रिटी शेफ असा यशस्वी प्रवास केला आहे. यासाठी त्यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला.

बीबीसी मास्टरशेफ प्रोफेशनल्समध्येही ते सहभागी झाले आहेत. सुरेश पिल्लई हे प्रसिद्ध सेलिब्रेटी शेफ आहेत आणि केरळच्या सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते ओळखले जातात.

सुरेश पिल्लई यांच्याकडे आत्तापर्यंत अनेक रेस्टॉरंट्स आहेत आणि मोठ्या संख्येने सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत जे त्याच्या स्वादिष्ट पाककृतीची प्रशंसा करतात. ई यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली..

सुरेश यांनी अशी अनेक कामे केली, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. आपल्या ट्विटर अकाऊंटवर संघर्षाची प्रेरणादायी गोष्ट शेअर केली, जिथे त्यांनी लग्नाच्या कार्यक्रमात कॅटरिंग सर्व्हिस बॉय म्हणून काम कसे करायचे याचे जुने फोटो पोस्ट केले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "हा 18 वर्षांचा कॅटरिंग सर्व्हिस मुलगा तोच शेफ पिल्लई आहे ज्याला तुम्ही आज ओळखता, एका अनोळखी लग्न समारंभात जेवण सर्व्ह करत आहे." बालपणीची आठवण करून दिली आणि 'व्यावसायिक' होण्याचे त्यांचे नशीब कसे होते हे सांगितले.

"मी सहावी किंवा सातवीच्या वर्गात माझा पहिला 'व्यवसाय' सुरू केला. आमच्या घरात एक मोठे काम्बिली मूसू/काम्बिली नारंग (पोमेलो) झाड होतं आणि ते माझे लहानपणीचे आवडते फळ होते. मला ते इतके आवडायचे की मी सकाळी 5 वाजता उठून नाश्त्याच्या वेळी एक-दोन काढायचो."

"लवकरच, तो मी माझ्या पॉकेटमनीचा पहिला स्रोत बनला. फळ कापून ते मी बाजारात 25 पैसे प्रति तुकडा किंवा एक रुपयाला 4-5 तुकडे विकायचो. त्यावेळी माझ्या मित्रांना एक-दोन रुपयांच्या नोटा दाखवल्या की मला माझा अभिमान वाटयचा!" असं म्हटलं आहे.

एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे त्यांनी मंदिरातील उत्सवांसाठी भाजलेले शेंगदाणेही विकले आहेत. ते म्हणाले, "तरुण असताना मी हॉटेलचा वेटर होतो, मंदिराच्या भोजनालयामध्ये क्लीनर होतो आणि त्याशिवाय मी एक कॅटरिंग बॉयही होतो."

"आज मी जे काही आहे, ते मला माझ्या भूतकाळातील अनुभवातून मिळाले आहे." सतत प्रयत्न करत राहा, यश मिळतं असंही सुरेश पिल्लई यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या प्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.