Republic Day: राजपथवर यंदा महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठं; जाणून घ्या चित्ररथाचं वैशिष्ट By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 10:01 PM 2023-01-22T22:01:04+5:30 2023-01-22T22:09:08+5:30
या चित्ररथाचे काम नवी दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरू आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून सास्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट संवाद साधला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ याचे दर्शन होणार आहे.
या चित्ररथाचे काम नवी दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरू आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून सास्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट संवाद साधला होता.
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
त्यामुळे या देवींच्या भव्य, तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासीयांना होणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते.
७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्तव्यपथावर (राजपथ) यावर्षी महाराष्ट्र मधून "साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती" या चित्ररथाचे संचलन होणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आज पत्रकार परिषदेतही याबाबत माहिती देण्यात आली.
सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चौरे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ट्विटर हँडलवरुन या चित्ररथाचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत असून अनेकांना या संकल्पनेचंही कौतुक केलं आहे.
यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवा मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे.
त्यांच्यासोबत ‘शुभ एड’चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. ३० जणांचा समावेश असलेल्या टीमला घेऊन राहुल धनसरे महाराष्ट्राचा चित्ररथ पूर्ण करण्याचे काम करीत आहेत