MLA's in India: देशात एकूण ४०३३ आमदार! कोणाचे किती? 'टॉप टेन'मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आहे का? धक्कादायक आकडेवारी... By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 01:41 PM 2022-12-09T13:41:29+5:30 2022-12-09T13:46:19+5:30
MLA's in India: गुजरातमध्ये आपने पाच जागा जिंकल्या, तर भाजपाने अभूतपूर्व यश मिळविले. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यावेळी मतदारांनी सर्वच पक्षांना खूश केले आहे. पाच राज्यांत लोकसभा आणि विधानसभांच्या देखील पोटनिवडणुका होत्या. त्यातही एकाच पक्षाला विजय न मिळता सर्व पक्षांना मतदारांनी संधी दिली आहे. गुजरातमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळविले असले तरी जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या अध्यक्षांना त्यांच्या राज्यात हिमाचल प्रदेशमध्ये काही सत्ता आणता आलेली नाहीय. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गुजरातमध्ये आपने पाच जागा जिंकल्या आहेत. याद्वारे आप देखील आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. गुजरात आणि हिमाचलच्या निकालानंतर भाजपा आणि आपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फटका बसला असला तरी देशभरातील आमदारांच्या संख्येत आजही काँग्रेस दोन नंबरला कायम आहे.
२८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश दिल्ली आणि पाँडीचेरी मिळून देशात एकूण ४ हजार ३३ आमदार आहेत. सर्वाधिक आमदार भाजपाचे आहेत. भाजपाचे एकूण १३७० आमदार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून त्यांचे ७७१ आमदार आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आहे. ममता यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या २१५ आहे. तर सर्वात कमी काळात आपने घवघवीत यश संपादन केले आहे. आप चौथ्या क्रमांकावर असून केजरीवालांच्या या पक्षाचे १६१ आमदार आहेत. आप पक्षाची स्थापना होऊन १० वर्षेच झाली आहेत.
पाचव्या क्रमांकावर वायएसआरसीपी असून त्यांचे १५१ आमदार आहेत. तर सहाव्या क्रमांकावर डीएमकेचे १३३ आमदार आहेत. सपाचे ११३, बीजेडी ११२, सीपीआय एम ८९, टीआरएस ८८ असे आमदार आहे.
देशातील ११ राज्यांत भाजपाचा मुख्यमंत्री आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपुर, त्रिपुरा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, सिक्किम आणि पाँडिचेरीमध्ये भाजपाच्या सहकारी पक्षांची सत्ता आहे.
भाजपाच्या आमदारांची संख्या वाढू शकते, कारण हे आकडे निवडणूक आयोगाने निवडणुकांनंतर दिलेले आहेत, त्यामुळे जे इतर पक्षात निवडून आले आणि नंतर भाजपात गेले त्यांची यात मोजदाद केलेली नाहीय.
संसदेत काय स्थिती... सध्या लोकसभेतील खासदारांची संख्या 542 आहे. एक जागा अजूनही रिक्त आहे. या 542 पैकी 303 खासदार भाजपचे आहेत. तर काँग्रेसकडे ५३ खासदार आहेत. त्याचप्रमाणे राज्यसभेत सध्या 239 सदस्य आहेत. 6 जागा रिक्त आहेत. यापैकी ९२ सदस्य भाजपचे आहेत. तर काँग्रेसचे ३१ खासदार आहेत.