- मयूर पठाडेविरेंद्र सेहवाग. मैदानावर असो, की मैदानाबाहेर, तो कायमच जोरदार ‘बॅटिंग’ करत असतो आणि एकेकाला उचलून सीमापार पाठवत असतो.प्रत्यक्ष मैदानावर तर त्यानं अनेकांची धू धू धुलाई केलीच, पण मैदानाबाहेरही त्याचा तोच उद्योग आताही सुरू आहे. सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवरुन, ट्विटरवरून तो सध्या जी काही धुलाई करतोय, ती तर त्याच्या केवळ चाहत्यांनाच नाही, प्रत्येकालाच पार खुश करून टाकणारी आहे.भारताचा टॉप स्पिनर आर. अश्विन कालच एका कार्यक्रमात सेहवागबाबत सांगत होता. अश्विन म्हणाला, ‘मी त्यादिवशी नेटमध्ये त्याला बॉलिंग करत होतो. पण बॉल कुठेही टाका, आॅफला, लेगला, मिडल लेंग्थ. चांगला, वाईट.. मी टाकलेल्या प्रत्येक बॉलच्या आणि माझ्या मानसिकतेच्याही तो चिंधड्या उडवत होता. त्याला बॉलिंग करणं म्हणजे समोरच्या बॉलरसाठी कायमच आपला आत्मविश्वास घालवून बसण्यासारखं आणि त्याला डिमॉरलाईज केल्यासारखं असतं. मलाही तो तसंच करत होता. माझ्याही मनात सारखं येत होतं, हा बॅट्समन एकतर काहीच्या काही टॅलेंट असलेला आहे किंवा मी तरी बॉलर म्हणून एकदम कंडम आहे, काही लायकीच नाही आपली..’ अश्विन पुढे सांगतो, मी पर खचलो. शेवटी मीच त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारलं, ‘सर, मैं आप को कैसा बॉल डालू, जो आप उसका कचरा नहीं करोंगे?’ सेहवागनं काय सांगावं? त्यानं अश्विनची उरलीसुरली हवाही काढून घेतली. सेहवाग त्याला म्हणाला, ‘स्पिनर क्या बॉलर होते है क्या? उनको तो मैं कहीं भी, किधर भी मार सकता हॅूँ’!अश्विन सांगतो, मी त्यानंतर अनेक प्रयोग केले, त्याला कशी बॉलिंग करायची यावर खूप विचार केला आणि त्याला प्रत्येक बॉल ‘वेगळा’ टाकायचा असं ठरवलं. त्यानंतर काही वेळा तो माझ्या बॉलिंगवर आऊट झाला!’तर अशी ही सेहवागची करामत!पण त्याचं आणखीही एक आगळंवेगळं रेकॉर्ड आहे. तुम्हाला माहीत आहे ते?काय आहे सेहवागचं वेगळं रेकॉर्ड?बॉलर दिसला की सुरुवातीलाच त्याचं कंबरडं मोडायचं, म्हणजे मग तो ताठ चालू शकत नाही, हे सेहवागचं धोरण. त्यामुळे पहिल्या बॉलपासून त्याला झोडून काढायचं आणि त्याचं मॉरल डाऊन करायचं हा सेहवागच आवडता उद्योग.त्यातूनच एक अनोखं रेकॉर्ड तयार झालं.सेहवाग हा जगातला पहिला बॅट्समन आहे, ज्यानं सामन्याच्या पहिल्याच बॉलला जास्तीत जास्त वेळा चेंडू सीमापार धाडला आहे. आपल्या करिअरमध्ये पहिल्याच बॉलला फोर मारण्याचा पराक्रम विरुनं तब्बल वीस वेळा केला आहे. २०११च्या वर्ल्ड कपमध्ये सेहवागनं भारताविरुद्धच्या पहिल्या पाचही सामन्यांत पहिल्याचा बॉलला चौका ठोकलेला आहे! पाकिस्तानच्या उमर गुलला तर त्यानं सामन्याच्या पहिल्याच चेंडूपासून सलग चार चौकार ठोकले आहेत. जगातला कोणताही बॅट्समन याबाबत सेहवागच्या आसपासही नाही. दुसऱ्या क्रमांकावरच्या शेन वॉटसननं पहिल्याच बॉलला आठ वेळा, अॅडम गिलख्रिस्टनं आठ वेळा आणि बांगला देशचा तमीम इकबाल या ओपनरसं सहा वेळा चेंडू बाऊंडरीच्या बाहेर तडकावला आहे.त्याच्या तडाख्यातून जगातले भलेभले बॉलरही सुटलेले नाहीत. आपल्या भक्ष्याला फाडून खाणारा सेहवाग ‘वाघ’ आहे ते यामुळेच!..