Uddhav Thackeray: देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १ By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 06:36 PM 2021-07-14T18:36:11+5:30 2021-07-14T18:41:56+5:30
Uddhav Thackeray: लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, याला सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राज्यांमधील परिस्थिती आणि मुख्यमंत्र्यांची कामगिरी यांवर चर्चा सुरू आहे.
तसेच अनेक राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विद्यामान मुख्यमंत्र्यांबाबत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे.
उत्तराखंडमध्ये तर दोनवेळा मुख्यमंत्री बदलण्यात आला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून अनेकविध मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेही चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र, यातच आता प्रश्नम यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. देशात ६७ टक्के लोकसंख्या असलेली १३ राज्ये या सर्व्हेसाठी निवडण्यात आली होती.
बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगना, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडु, केरळ, आसाम या राज्यांचा यात समावेश करण्यात आलेला नाही.
आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात पॅनेल नसल्यामुळे तेथील सर्व्हे करता आला नसून, पुढील फेरीत या राज्यांमध्ये सर्व्हे केला जाईल, असे प्रश्नमकडून सांगण्यात आले आहे.
या १३ राज्यांतील १७ हजार ५०० जणांनी सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवला होता. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब आहे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये, कामगिरी चांगली असली तरी पुन्हा मत देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे आणि पुढीलवेळी हेच मुख्यमंत्री हवेत, असे पर्याय देण्यात आले होते.
लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, याला सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. सर्व्हेमध्ये जवळपास ४९ टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असून, त्यांना पुन्हा मतदान करू असे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्याखालोखाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना ४४ टक्के मते मिळाली असून, तिसऱ्या स्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आहेत. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांबाबत सर्वाधिक नकारात्मक मत नोंदवण्यात आले असल्याचे समजते.
लोकप्रिय नसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कामगिरीबाबत समाधन व्यक्त केले, तरी पुन्हा मत देण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले आहे.
उत्तराखंड आणि पंजाबनंतर यादीत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा क्रमांक लागतो. तर, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ पाचव्या स्थानी आहेत.
उत्तराखंड, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याबाबतचे वृत्त द प्रिंटने दिले आहे.