Ultra Rare Black Tiger: पांढरा, पिवळा पाहिला असेल, काळा वाघ कधी पाहिलाय का? २३ वर्षांच्या फोटोग्राफरने काढलेत फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:06 AM 2022-02-04T10:06:17+5:30 2022-02-04T10:11:05+5:30
Ultra Rare Black Tiger spotted in India, Odisha: आजवर फक्त ऐकले होते, अवघ्या तीस फुटांवर दोन वाघ उभे होते, अंगावर काटे आणणारा पण तेवढाच खतरनाक प्रसंग.... बंगालचा टायगर, आपल्याकडे आढळणारा पट्टेदार वाघ, पांढरा वाघ तुम्ही प्रत्यक्ष फोटोंमध्ये पाहिले असतील. परंतू काळा वाघ नक्कीच पाहिला नसेल. एका २३ वर्षांच्या फोटोग्राफरने ओडिशाच्या नंदनकानन झूलॉजिकल पार्कमध्ये या काळ्या वाघाचे फोटो काढले आहेत. हा वाघ गेल्या काही वर्षांत केवळ ७-८ वेळाच दिसला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जवळपास ५० वर्षांपूर्वी स्थानिक लोक अशाप्रकारचा वाघ पाहिल्याचे सांगू लागले होते. परंतू त्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हता. पट्टेरी वाघाच्या पाठीवर काळी लव मोठ्या प्रमाणावर होती, यामुळे लोक त्याला काळा वाघ म्हणू लागले.
वाघांची ही अप्रतिम छायाचित्रे दिल्लीतील २३ वर्षीय छायाचित्रकार सत्य स्वागत याने टिपली आहेत. जेव्हा सत्या हे फोटो काढत होता तेव्हा तो वाघांपासून फक्त 30 फूट अंतरावर होता असे सांगण्यात आले. हे दोन्ही वाघ नर आहेत, हे फोटो सत्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कॅमेऱ्यात टिपले होते.
सत्याने सांगितले की, जेव्हा त्याने हा अद्भुत प्राणी पहिल्यांदा पाहिला तेव्हा अंग शहारले होते. जेव्हा वाघ तिथून जात होता तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि काही क्षणांसाठी मी माझा कॅमेरा उचलण्यास विसरलो.
सत्याने सांगितले की, या दुर्मिळ वाघाबद्दल त्याने पहिल्यांदा नंदनकाननला गेलेल्या त्याच्या मित्रांकडून ऐकले होते. तो पुढे म्हणाला की, त्यांना फारसे लोकांनी पाहिले नाही किंवा त्यांच्या जवळ जाऊ शकले नाहीत. तो म्हणतो की मला 2020 मध्ये वाघाचा फोटो काढण्याची संधी मिळालेली पण तो फोटो स्पष्ट नव्हता. अखेर गेल्या नोव्हेंबरमध्ये ही संधी आली.
वाघ काळा का दिसतो... वाघावरील काळा रंग स्यूडो मेलॅनिझम नावाच्या अनुवांशिक म्युटेशनमुळे होतो. या अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे वाघांचे विशिष्ट पट्टे विस्तृत आणि गडद रंगाचे दिसतात. या पट्ट्यांमुळे, वाघ कधीकधी पूर्णपणे काळे दिसतात.
शिमलीपाल नॅशनल पार्क, ओडिशात 1993 पासून दुर्मिळ काळे वाघ दिसले. 2007 साली पहिल्यांदाच त्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले. कलाकार जेम्स फोर्ब्स यांनी 1773 मध्ये केरळमध्ये काळ्या वाघाचे चित्र काढले होते.