Omicron Variant : सावधान! "देशात येत्या काही दिवसांत येणार कोरोनाची लाट; ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 08:36 AM2021-12-30T08:36:12+5:302021-12-30T08:59:41+5:30

Omicron Variant : देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नवी लाट येऊ शकते अशी माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.

जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपली जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढला आहे.

वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा देशातील 22 ऱाज्यांमध्ये संसर्ग झाला आहे. तर 700 हून अधिक रुग्ण हे आढळून आले आहेत. काही राज्यांनी वाढता धोका लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू आहे.

दिल्लीमध्ये तर गंभीर परिस्थिती असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे, येत्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.

देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नवी लाट येऊ शकते अशी माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. ही लाट काही दिवसांसाठी असेल पण ती मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्गित करेल असं म्हटलं आहे.

ओमायक्रॉनचा भारतात आता कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून येत्या काही दिवसांत रुग्णवाढीचा दर वेगाने वाढणार आहे, असा इशारा केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाची अल्प काळातील लाट येऊन अधिकाधिक नागरिकांना ओमायक्रॉनची लागण होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.

केंब्रिज विद्यापीठाच्या जज बिजनेस स्कूलमधील प्रा. पॉल कट्टूमन यांनी "कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित केला असून एका ई-मेलमध्ये त्यांनी लिहिले आहे, येत्या काही दिवसांत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढेल."

"कदाचित या आठवडय़ातही वाढण्याची शक्यता आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत किती वाढ होईल, हे आता सांगणे कठीण आहे" असं देखील म्हटलं आहे. कट्टूमन आणि त्यांचा संशोधक गट गेल्या काही दिवसांतील भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर लक्ष ठेवून आहेत.

तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला असून अलर्ट राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सरकारच्या वतीने देखील लोकांना कोरोना नियमावलीचं पालन करा, मास्क लावा यासारख्या गोष्टींचं आवाहन केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंट हा अत्यंत वेगाने पसरत असून तो घातक असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच लोकांना सतर्क करत धोक्याचा इशारा दिला आहे.

जगभरातील सरकारांनी आता कोरोना या महाभयंकर संकटाचा अंत करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. तसेच त्यासाठी नेमकं काय काय करणं गरजेचं आहे याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी 2022 या वर्षात आपण कोरोना नावाच्या या साथीच्या रोगाचा अंत केला पाहिजे. येत्या वर्षात अंत करायचा असल्यास, वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकसंख्येचं लसीकरण केले जाईल, याची खात्री करून ही असमानता संपवायला हवी असं म्हटलं आहे.

"जागतिक स्तरावर लसीकरण लक्ष्य साध्य करण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावेल" अशी आशा WHO प्रमुखांनी व्यक्त केली आहे. जगभरात या वर्षी तब्बल 3.3 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी साथीच्या रोगामुळे आपला जीव गमावला आहे असंही म्हटलं आहे,

"ओमायक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा जास्त पटीने होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच ज्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे आणि जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांना देखील ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे" असं म्हटलं आहे.