मानव विरहीत बोट वाचवणार जीव अन् गुप्तहेरही बनणार; मोदीही झाले इम्प्रेस, भारतासाठी ५० बोटी घेतल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 12:24 PM2022-07-21T12:24:06+5:302022-07-21T12:35:28+5:30

भारतीय नौदलाला एक अशी मानव विरहीत समुद्री बोट मिळालीय की जी एखाद्याचा जीवही वाचवू शकते आणि शत्रुवर नजरही ठेवू शकते. अगदी पंतप्रधान मोदींनाही या बोटीची भुरळ पडली.

समुद्रात जेव्हा एखादा व्यक्ती किंवा अनेकजण दुर्घटनेमुळे बुडत असतात तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी जीवरक्षक बोटी पाठवाव्या लागतात. तर युद्धाची परिस्थिती असेल तर अशात शत्रुच्या हल्ल्यात आपल्या बोटीचं नुकसान होण्याचीही दाट शक्यता असते.

समुद्रातील संकटात बचावकार्य सर्वात कठीण मानलं जातं आणि यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. या परिस्थितींना तोंड देण्यासाठी आता मानव विरहीत बोट (Unmanned Surface Vehicle- USV) खूप कामी येणार आहे.

महत्वाचं म्हणजे या अत्याधुनिक बोटीचे ५० युनिट्स याआधीच भारतीय नौदलाला देण्यात आल्या आहेत. तर आणखी ५० युनिट्स या वर्षाच्या अखेरपर्यंत नौदलात दाखल होतील.

कोलकातामधील संरक्षण कंपनी सैफ सीसनं (Saif Seas) या बोटींची निर्मिती केली आहे. या USV बॅटरीवर चालतात. यात हाय-डेफिनेशन कॅमेरे, रोबोटिक प्रोब्स किंवा शस्त्रास्त्र अपलोड करुन या बोटीचा विविध उद्देशांसाठी वापर केला जाऊ शकतो.

सुरुवातीला ही USV बोट समुद्रात बुडत्या व्यक्तीला वाचवण्याच्या उद्देशानं बनवण्यात आली होती.

पुढे जाऊन या बोटीमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आणि बोटीला एक मजबूत तांत्रिक बळ मिळालं. आता ही बोट एकाच वेळी तीन जणांना वाचवू शकते.

तसंच ही बोट ३०० किलो वजन अतिशय सहजपणे वाहून नेण्याची बोटीची क्षमता आहे. सैफ सीस कंपनीला या बोटी भारतीय लष्काराला देखील द्यायच्या आहेत. यासाठीची बोलणी सध्या सुरू आहे.

लडाखच्या पेगाँग लेकमध्ये शत्रुच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या बोटीचा वापर होऊ शकतो. कंपनीनं लडाखमध्ये याचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं आहे. याशिवाय या बोटीचं प्रात्यक्षक एनडीआरएफच्या पथकासमोर वाराणसी आणि पुणे येथेही झालं आहे.

नुकतंच ही बोट ईस्ट टेक एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या टेक एक्स्पोमध्ये सामील झाले होते. मोदींनाही या बोटीची भूरळ पडली होती.

जेव्हा एखादा व्यक्ती समुद्रात बुडत असेल त्यावेळी ही बोट रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत तात्काळ पोहोचवता येते. बुडणारा व्यक्ती जसा या बोटीचा आधार घेतो तसं लगेच ही बोट किनाऱ्याच्या दिशेनं येऊ लागते. त्यामुळे बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षकांची वाट पाहावी लागत नाही.