बांगलादेशात अशांतता, पाकिस्तानचं नवं षडयंत्र; भारतासमोर मोठं आव्हान, रिपोर्टमधून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 05:56 PM 2024-08-12T17:56:40+5:30 2024-08-12T18:20:13+5:30
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हिंसक आंदोलनामुळे देशात सत्तापालट झाली आहे. मात्र या परिस्थितीचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. बांगलादेशात झालेल्या सत्तांतराचे परिणाम भारतावरही पाहायला मिळत आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय सीमांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे तर दुसरीकडे बांगलादेशातील या घटनांनंतर आता दहशतवादी संघटनांची सक्रीयता वाढण्याचा धोका उद्भवला आहे.
बांगलादेशात शेख हसीना यांच्या सरकारविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले होते. मात्र समोर आलेल्या गुप्त माहितीनुसार या आंदोलनातून झालेल्या हिंसाचार, उद्रेक यात दहशतवादी संघटनांचा हात होता ज्यांचे षडयंत्र बांगलादेशी हिंदूंविरोधात रचलं गेले होते.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानातील लष्कर ए तोयबानं कथितपणे भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी बांगालादेशच्या अंसारुल्लाह बांग्ला टीमसोबत हातमिळवणी केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI नं बांगलादेशात झालेल्या या बदलामध्ये मोठी भूमिका निभावली.
बांगलादेशात जमात ए इस्लामी, अंसरुल्लाह बांग्ला टीमसह अन्य दहशतवादी संघटनांना आयएसआयचं पाठबळ होतं. ABT आणि LET यांच्यात २०२२ मध्ये एक षडयंत्र रचलं गेले ज्यातून भारतात दहशतवादी हल्ले घडवता येईल असा उद्देश ठेवण्यात आला असं रिपोर्टमधून उघड झालंय.
त्रिपुरा येथे मस्जिदांना झालेल्या नुकसानीच्या बातम्यांनंतर लष्कर आणि एबीटीने ही हातमिळवणी केली. २०२२ च्या गुप्तचर माहितीनुसार, जवळपास ५० ते १०० एबीटी तुकड्या त्रिपुरामध्ये घुसखोरी करण्याची योजना बनवत होते पंरंतु यातील अनेकांना अटक करण्यात आली होती.
काय आहे अंसारुल्लाह बांग्ला टीम (ABT) - या संघटनेची सुरुवात २००७ मध्ये झाली होती जेव्हा जमात उल मुस्लिमीन नावाची एक संघटना चर्चेत होती. मात्र फंडिगच्या कमतरतेमुळे याचा प्रभाव फारसा झाला नाही. त्यानंतर २०१३ मध्ये अंसरुल्लाह बांग्ला टीम पुन्हा एकदा समोर आली.
२०१५ साली या संघटनेवर बंदी आणण्यात आली. त्यानंतर अंसार उल इस्लाम या नावाने त्यांनी ब्रँडिंग केली. २०१७ मध्ये पुन्हा यावरही बंदी आणली. तेव्हापासून अंसार अल इस्लामने स्वत:ला भारतीय उपखंडातील अल कायदा (AQIS)ची बांगलादेशी शाखा म्हणून स्थापना केली.
या संघटनेवर बांगलादेशात अनेक धर्मनिरपेक्ष लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. दक्षिण आशियातील दहशतवादी पोर्टलनुसार, २०१३ पासून संपूर्ण बांगलादेशात जवळपास ४२५ एबीटी, अंसार अल इस्लाम सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशात सध्या ९ दहशतवादी संघटना सक्रीय - अंसारुल्लाह बांग्ला टीम (ABT), अंसार अल इस्लाम, लष्कर ए तौयबा, हरकत उल जिहाद अल इस्लामी बांगलादेश, जगराता मुस्लिम जनता बांगलादेश, जमात उल मुजाहिदीन बांगलादेश, पुरबा बांग्लार कम्युनिस्ट पार्टी, इस्लामी छात्र शिबीर, इस्लामित स्टेट
बांगलादेशातील माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या दहशतवादी संघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी अनेक पावलं उचलली होती. अलीकडच्या विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व विद्यार्थी नसून दहशतवादी करतायेत असा आरोपही शेख हसीना यांनी केला होता. शेख हसीना यांनी जमात ए इस्लामीसारख्या अनेक संघटनांवर बंदी आणली होती.