राजकीयदृष्ट्या देशातील सर्वाधिक महत्त्वाचे राज्य उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचा वनवास अखेर संपला आहे. पक्षाने तब्बल १४ वर्षांनंतर राज्यात एकहाती सत्ता काबीज करीत नवा इतिहास रचला आहे. भाजपाने त्याचे मित्रपक्ष अपना दल (सोनेलाल पटेल) आणि भारतीय समाज पार्टी (सुहेलदेव) यांच्या सोबतीने तिहेरी शतक ठोकून विरोधकांना अक्षरश: पळता भुई थोडी केली. राज्यातील एकूण ४०३ पैकी ३२४ जागा या आघाडीने प्राप्त केल्या आहेत. यापूर्वी १९९१ साली पक्षाने रामजन्मभूमी आंदोलनाच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यातील ४२५ जागांपैकी २२१ जागांवर विजय संपादित केला होता. दुसरीकडे राज्यातील लोकांनी सपा नेते अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा ‘यूपी को साथ पसंद है’ हा नारा सपशेल फेटाळला, तर बसपाच्या मायावती यांनाही पुन्हा एक संधी देण्यास नकार दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाची जी दैनावस्था झाली होती तशीच यंदाही झाली. उत्तराखंडातही भाजपाने एकूण ७० पैकी ५७ जागांवर ताबा मिळवीत प्रचंड बहुमत प्राप्त केले आहे, तर सत्ताधारी काँग्रेसची धूळधाण उडाली आहे.लखनौ : भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये विखुरलेल्या विरोधकांना धोबीपछाड देत शनिवारी अभूतपूर्व विजय मिळविला. ४०३ सदस्यीय राज्य विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाने तीन चतुर्थांश म्हणजे तब्बल ३२४ जागा जिंकून राज्यात एकहाती सत्ता काबीज केली. या निवडणुकीत सपा-काँग्रेस युती आणि बसपाचा दारुण पराभव झाला. युतीला ५५ तर बसपाला केवळ १९ जागा जिंकता आल्या. या पराभवानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. भाजपा नेत्यांनी पक्षाच्या या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि त्यांच्या गरिबोन्मुख धोरणांना दिले आहे.मोदींच्या नेतृत्वात भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये १५ वर्षांच्या वनवासानंतर जोरदार ‘वापसी’ केली. सपा-काँग्रेस युती व बसपाची कामगिरी दयनीय राहिली. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत एखाद्या पक्षाला मिळालेला हा सर्वांत मोठा जनादेश आहे.उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार दिला नव्हता. उद्या रविवारी भाजपा संसदीय मंडळ आणि विधिमंडळ पक्षाच्या संयुक्त बैठकीत नवा मुख्यमंत्री निवडला जाईल. मावळत्या विधानसभेत केवळ ४७ जागा असलेल्या भाजपाने या निवडणुकीत ४० टक्के मते काबीज केली. विशेष म्हणजे या वेळी भाजपाने एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते, तरीही मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपाचे अनेक उमेदवार विजयी झाले. (वृत्तसंस्था)उत्तराखंडमध्ये भाजपाचा झेंडाडेहराडून : उत्तराखंडच्या ७० सदस्यीय विधानसभेत ५० जागा काबीज करीत भाजपाने स्पष्ट बहुमत पटकावले आहे. दुसऱ्या स्थानी राहिलेल्या काँग्रेसला अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री हरीश रावत यांना हरिद्वार ग्रामीण आणि किच्छा या दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला. नेतृत्वातील उणिवांची कबुली देत रावत यांनी राज्यपाल कृष्णकांत पाल यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेससमोर बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले होते. हरकसिंग रावत, सुबोध युनियाल, रेखा आर्य, सौरव बहुगुणा, प्रदीप बात्रा, यशपाल आर्य आदींनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाशी घरठाव केल्यामुळे काँग्रेसची अडचण वाढली होती. कमी संसाधने असताना आम्ही परिश्रम घेतले असून, पक्ष कार्यकर्त्यांच्या उमेदीला खरे उतरू शकलो नाही.ही लाट मोठीच...इ.स. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच याहीवेळी मोदींची लाट स्पष्ट दिसत होती. विशेष म्हणजे ही लाट उत्तर प्रदेशात १९९१ साली भाजपाचे सरकार सत्तारूढ झाले त्या वेळी आलेल्या राम लाटेपेक्षा किती तरी जास्त वेगवान आहे. राम मंदिर आंदोलन काळात जनतेच्या अभूतपूर्व पाठिंब्याच्या आधारे उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणाऱ्या भाजपाला १९९१ च्या या निवडणुकीत २२१ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्या वेळी भाजपाला ३१.७६ टक्के मते पडली होती. ४१९ जागांसाठी या निवडणुका झाल्या होत्या. या वेळी उत्तराखंडातही भाजपाची जादू चालली. भाजपा या राज्यात सर्वाधिक जागांसह सरकार स्थापन करणारा पहिला पक्ष असणार आहे.आमच्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखविले त्याबद्दल मी जनतेला मनापासून धन्यवाद देतो. - नरेंद्र मोदीजाती-धर्मांच्या बंधनाच्या पलीकडे जाऊन जनतेने विकास आणि विकासाचा पुरस्कार करणाऱ्या सरकारच्या बाजूने कौल दिला. - अमित शहाउत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाने केवळ विजय मिळविला नसून तो ‘महाविजय’ आहे. या दोन राज्यांतील विजयाने नवी उंची गाठत देशाच्या राजकारणाची कहाणी बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वसनीयता, त्यांचे नेतृत्व आणि पक्षाच्या सुशासनाप्रति केलेल्या संकल्पाचा हा विजय आहे. - राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्रीपंजाबमधील जनतेने उज्ज्वल भविष्यासाठी जनादेश दिला आहे. विशेषत: युवकांच्या भवितव्यासाठी दिलेला हा कौल आहे. या राज्यातील जनतेने मोठा विश्वास दाखवत समर्थन दिल्याबद्दल मी आभार मानतो. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील भाजपाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. - राहुल गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्षव्होटिंग मशिन (ईव्हीएम) गैरप्रकारामुळे भाजपाला अभूतपूर्व विजय मिळाला. ही निवडणूक रद्द करीत जुन्या मतपत्रिकांच्या आधारे निवडणूक घेतल्यास ‘दूध का दूध’ सिद्ध होईल. मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्येही बहुतांश मते भाजपाला मिळाल्यामुळे व्होटिंग मशिन मॅनेज करण्यात आल्याच्या शंकेला पुष्टी मिळते. - मायावती, बसपाच्या अध्यक्ष