...तर लाखो भारतीय बहिरे होतील; संयुक्त राष्ट्रानं दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 03:52 PM2022-03-28T15:52:18+5:302022-03-28T15:56:35+5:30

शहरात राहणाऱ्या लाखो भारतीयांना बहिरेपण येण्याचा धोका

वाढत्या शहरीकरणासोबतच ध्वनिप्रदूषणाची समस्यादेखील वाढू लागली आहे. देशाच्या अनेक शहरांमधील ध्वनी प्रदूषणाचं प्रमाण वाढलं आहे. संयुक्त राष्ट्रानं याबद्दलचा अहवाल प्रकाशित केला आहे.

पितळेची नगरी अशी ओळख असणारं उत्तर प्रदेशातलं मोरादाबाद शहर ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमाकांवर आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (यूएनईपी) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात अहवालात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असलेल्या शहरांचा उल्लेख आहे.

सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीत बांगलादेशची राजधानी ढाका पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत एकूण ६१ शहरांचा समावेश आहे. मुरादाबादसोबत भारतातील आणखी ४ शहरांचा यादीत समावेश आहे.

बांगलादेशची राजधानी ढाक्यात ध्वनिप्रदूषणाचं प्रमाण सर्वाधिक आहे. ढाक्यात आवाजाची पातळी ११९ डेसिबलपर्यंत जाते. मुरादाबाद (११४ डेसिबल) दुसऱ्या, तर इस्लामाबाद (१०५ डेसिबल) तिसऱ्या स्थानी आहे.

जगातील ६१ शहरांमधील ध्वनिप्रदूषणाचं प्रमाण अधिक आहे. यामधील १३ शहरं दक्षिण आशियातील आहेत. त्यातली ५ शहरं एकट्या भारतातील आहेत. कोलकाता, आसनसोलमध्ये प्रत्येकी ८९ डेसिबलची नोंद करण्यात आली. जयपूरमध्ये ८४ आणि दिल्लीत ८३ डेसिबल इतका आवाज नोंदवण्यात आला.

दिल्लीची लोकसंख्या १ कोटी ९० लाख इतकी आहे. कोलकात्यात जवळपास दीड कोटी लोक राहतात. जयपूरची लोकसंख्या ४१ लाख, आसनसोलची १४ लाख, तर मोरादाबादची ९ लाख इतकी आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या लाखो लोकांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं रहिवासी आणि व्यवसायिक क्षेत्रांमध्ये आवाजाची पातळी किती असावी यासाठी काही मर्यादा आखून दिल्या आहेत. रहिवासी भागातील आवाज ५५ डेसिबलपेक्षा अधिक आणि व्यवसायिक भागातील आवाज ७० डेसिबलच्या पुढे नसावा, अशा मार्गदर्शक सूचना आहेत.

६० डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज असलेल्या भागात ८ ते १० तास घालवणाऱ्या व्यक्ती लवकर दमतात. निद्रानाश, चिडचिडेपणा, डोकेदुखी अशा त्रासांचा सामना त्यांना करावा लागतो.

चाळिशी ओलांडलेल्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, हृदय रोग, कायमचं बहिरेपण, स्मरणशक्ती कमजोर होणं अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो. शहरं वाढतील, तशी ध्वनिप्रदूषणाची समस्या वाढेल, असं संयुक्त राष्ट्रानं अहवालात म्हटलं आहे.