चामोलीतील हिमकड्यांच्या खाली छिद्र, भूकंप आल्यास ओढावेल विनाशकारी संकट! By मोरेश्वर येरम | Published: February 8, 2021 05:49 PM 2021-02-08T17:49:05+5:30 2021-02-08T17:58:43+5:30
उत्तराखंडमधील चामोली येथे हिमकडा कोसळून (chamoli glacier burst) मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी सध्या मदतकार्य सुरूय, यात १०० ते २०० जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पण चामोलीतील हिमकड्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात... उत्तराखंडमध्ये असे काही हिमकडा आहेत की ज्या विनाशकारी ठरू शकतात. चामोली जिल्ह्यातील माऊंट त्रिशूल आणि माऊंट नंदाघुटीवर मोठ्या हिमकडा आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्या वितळत आहेत आणि यामुळे मोठं संकट ओढावू शकतं. या हिमकडांच्याखाली एक मोठं छिद्र निर्माण झाल्याचंही सांगण्यात येतंय. यामुळे भविष्यात निसर्गाचा मोठा प्रकोप ओढावू शकतो.
शिला समुद्र हिमकडा (Shila Samudra Glacier) असं या हिमकड्याचं नाव आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, याठिकाणी एखादा भूकंप झाला तर शिला हिमकडा कोसळू शकतो आणि यामुळे तब्बल २५० किमीपर्यंत नुकसान होऊ शकतं. म्हणजेच चामोलीपासून हरिद्वारपर्यंत याचे परिणाम दिसू शकतात.
शिला समुद्र हिमकड्यावर लोक ट्रेकिंगसाठी जातात. रुपकुंड-जुनारगली-होमकुंड ट्रेक देखील याच मार्गात आहे. शिला समुद्र हिमकड्याखाली भलामोठा दगडाचा भाग आहे.
शिला समुद्र हिमकड्याचा बर्फाळ भाग नंदाघुंटी येथून जातो. या जागेतून राजजात नावाची धार्मिक यात्रा देखील निघते. शिला समुद्र हिमकडा तब्बल ९ किलोमीटरपर्यंत पसरला आहे. चिंतेची बाब अशी की या हिमकड्याखाली नैसर्गिकरित्या दोन मोठे छिद्र तयार झाले आहेत. २००० साली हे छिद्र खूप छोटं होतं. पण २०१४ पर्यंत यात वाढ झालीय.
आता या दोन्ही छिद्रांजवळ मोठ तडे गेले आहेत. या तड्यांमुळे भविष्यात मोठं संकट निर्माण होऊ शकतं. हिमालयाच्या वरच्या भागात हलका भूकंप जरी आला तर हे तडे मोठे होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते, असं या पर्वतरांगांचे अभ्यासक सांगतात.
रुपकुंड येथे जाणाऱ्या ट्रेकर्सना शिला समुद्र हिमकडा ओलांडून जावं लागतं. तर नंदादेवी राजजात यात्रा दर १२ वर्षांनी आयोजित केली जाते. यावेळी नंदा देवीची पूजा अर्चा केली जाते.
२०१३ सालच्या नैसर्गिक आपत्तीनंतर शास्त्रज्ञ सातत्यांनं हिमालयावर अभ्यास करत आहेत. देहरादूनच्या भू-विज्ञान संस्थेच्या संशोधकांनीही धोक्याची सूचना दिली आहे. हिमकड्यांमुळे तयार होत असणारे पाण्याचे प्रवाह धोकादायक ठरू शकतात. २०१३ सालची प्रकोप याचं मोठं उदाहरण आहे.
श्योक नदीसोबतच हिमालयातील नद्यांवर वैज्ञानिकांनी केलेला अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ग्लोबल अँड प्लॅनटरी चेंजमध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनात जगातील सुप्रसिद्ध जियोलॉजिस्ट प्रोफेसर केनिथ हेविट यांनी मदत केली होती.
वाडीया इन्स्टिट्यट ऑफ जियोलॉजीचे वैज्ञानिक डॉ. राकेश भांबरी, डॉ. अमित कुमार, डॉ अक्षय वर्मा आणि डॉ. समीर तिवारी यांनी २०१९ साली हिमालयातील नद्यांचा प्रवाह रोखण्यासंदर्भात रिसर्च प्रकाशित केला होता.
वैज्ञानिकांनी या अभ्यासात श्योक नदीच्या जवळपास हिमालयातील क्षेत्रात १४५ ठिकाणी लेक आऊटबर्स्टच्या घटनांचा शोध लावला आहे. या सर्व घटनांना अभ्यास करुन एक अहवाल तयार करण्यात आला. यातून हिमालयातील सर्व पर्वतरांगांवरील हिमकडे वेगानं वितळत असल्याचं निष्पन्न झालं आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या काराकोरम भागात हिमकड्यांचं प्रमाण वाढत असल्याचंही दिसून आलं आहे.