CoronaVaccine : 5 टप्प्यांत होणार लसिकरण, पहिल्या टप्प्यात 31 कोटी लोकांना दिली जाणार लस

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 28, 2020 03:45 PM2020-11-28T15:45:46+5:302020-11-28T15:50:39+5:30

भारतात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 93 लाखच्याही पुढे गेला आहे. अशात सर्वांच्या नजरा कोरोनाविरोधातील लशीकडे लागल्या आहेत.

यातच आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी लस तयार करणाऱ्या तीन कंपन्यांच्या दौऱ्यावर आहेत. यात ते अहमदाबादमधील जायडस कॅडिला प्लँट, हैदराबादेतील भारत बायोटेक प्लँट आणि सर्वात शेवटी पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला भेट देत आहेत.

पंतप्रधानांच्या या दौऱ्याबरोबरच, लस कधीपर्यंत उपलब्ध होईल आणि ती सर्वप्रथम कुणाला दिली जाईल, अशी चर्चा सुरू आहे. तर पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच देशात लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

खरे तर, यापूर्वीच प्रायोरिटी गट तयार करण्यात आले आहेत. या गटांची पाच टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम देशातील एक कोटी फ्रंट लाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.

केंद्र सरकार, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने, अशा 31 कोटी लोकांची ओळख पटवत आहे, ज्यांना सुरुवातीच्या टप्प्यात लस दिली जाईल. पहिल्या टप्प्यात एक कोटी डॉक्टर्स, एमबीबीएस स्ट्यूडेंट्स, नर्स आणि आशा वर्कर्सना लस दिली जाईल.

दुसऱ्या टप्प्यात देशातील कोरोना वॉरियर्सना लस टोचली जाईल. यात महापालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.

तिसऱ्या टप्प्यात सरकारी कर्मचाऱ्यांना लस टोचली जाईल.

चौथ्या टप्प्यात 50 वर्ष वयोगटापेक्षा अधिक वय असलेल्या 26 कोटी नागरिकांना लस टोचली जाईल.

पाचव्या टप्प्यात सरकार, अशा लोकांना लस देईल, ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. या गटात 50 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे आणि त्यांना अधिक देखभालीची आवश्यकता आहे.