१२ तासांत दिल्ली गाठता येणार! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईहून सुरू होणार? तयारीला वेग By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:08 PM 2023-07-21T22:08:12+5:30 2023-07-21T22:13:56+5:30
Vande Bharat Express Sleeper Train: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे स्लीपर व्हर्जन लवकरच येणार असून, मुंबई-दिल्ली मार्गावर पहिली ट्रेन चालवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. Vande Bharat Express Sleeper Train: भारतीय रेल्वेची सर्वाधिक लोकप्रिय ट्रेन असण्याचा मान आताच्या घडीला वंदे भारत एक्स्प्रेसला आहे. प्रवाशांची पसंती या ट्रेनला मिळत आहे. देशभरातील २५ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा सुरू आहे. लवकरच मिनी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन ४० मार्गांवर सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच वंदे भारत रेल्वेचे रुपडे पालटणार असून, प्रवाशांच्या सूचनांनुसार २५ ते २८ बदल वंदे भारतमध्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावू शकते. या ट्रेनचा प्रोटोटाइप ICF येथे तयार केला जात आहे. मुंबई ते दिल्ली मार्गावर मिशन रफ्तारचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत मुंबई ते दिल्ली मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावू शकते, असा कयास बांधला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते दिल्ली प्रवासाचा वेळ १६ तासांवरून १२ तासांवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०१७-१८ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. मुंबई ते दिल्ली संपूर्ण मार्ग ताशी १६० किमी वेगाने सक्षम करणे हे या मिशन रफ्तार प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
मुंबई ते दिल्ली दरम्यान ट्रॅकचे मजबुतीकरण, पुलांचे सक्षमीकरण, OEHचे आधुनिकीकरण, संपूर्ण मार्गावर कवच यंत्रणा बसवणे, ट्रॅकच्या दोन्ही बाजूला कुंपण घालणे आदी कामे करण्यात येत आहेत. मुंबई सेंट्रल ते नागदा दरम्यानच्या ६९४ किमी लांबीचे काम सुरू आहे. मुंबई सेंट्रल ते नागदासह पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीतील वडोदरा ते अहमदाबाद दरम्यान सुमारे १०० किमीचे काम सुरू आहे.
या संपूर्ण कामासाठी ३ हजार २२७ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. १९५ किमीपर्यंत संरक्षण भिंत बांधायची होती, त्यापैकी ३० किमीचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई ते अहमदाबाद या ५७० किमीपैकी ४७४ किमीचे मेटल बॅरियर फेन्सिंगचे काम पूर्ण झाले आहे.
याशिवाय पश्चिम मध्य रेल्वे नागदा ते मथुरा या ५४५ किमीवर काम करत आहे. यासाठी २ हजार ६६४ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. उत्तर मध्य रेल्वे मथुरा ते पलवल ८२ किमीचे काम करत आहे. पलवल ते दिल्ली दरम्यान ५७ किमीचे काम उत्तर रेल्वेकडून केले जात आहे.
ICF ने ८६ वंदे भारत ट्रेन बनवण्याचे कंत्राट देण्यात आले असून, पैकी ९ ट्रेन स्लीपर व्हर्जनच्या असतील. स्लीपर व्हर्जनचा प्रोटोटाइप लवकरच तयार होत आहे. याशिवाय पुढील चार वर्षांत भारतीय रेल्वेला देशभरात एकूण ४०० वंदे भारत ट्रेन सुरू करायच्या आहेत.
यामध्ये वंदे भारत सीटिंग व्हर्जन, वंदे भारत स्लीपर व्हर्जन आणि वंदे भारत मेट्रो व्हर्जन यांचा समावेश आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) EMU लोकल ट्रेनऐवजी वंदे भारत मेट्रो आवृत्तीसाठी निविदा लवकरच काढल्या जाणार आहे. आणखी २४० वंदे भारत स्लीपर व्हर्जन ट्रेनची निविदा लवकरच ICF कडून देण्यात येईल. या नव्या वंदे भारत ट्रेन राजधानी आणि दुरांतो मार्गावर धावतील.
मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-दिल्ली मार्ग हे नेहमीच व्यस्त आणि वर्दळीचे मार्ग राहिले आहेत. या मार्गावर देशातील सर्व प्रिमियम सेवा रेल्वेकडून चावल्या जातात. १७ मे १९७२ मध्ये मुंबई-दिल्ली मार्गावर राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. आता तेजस राजधानी एक्सप्रेस सेवेत आहे.
देशातील पहिली खाजगी तेजस एक्सप्रेस ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर सेवेत आहे. या मार्गावर एसी डबल डेकर ट्रेनही सुरू असून, देशातील पहिल्या हायस्पीड म्हणजेच बुलेट ट्रेनचा मार्गही याच मार्गादरम्यान तयार करण्यात येत आहे.
दिल्ली-मुंबई मार्गावर विमानसेवा असो की रेल्वेसेवा, या मार्गावर नेहमीच मागणी असते. या मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचे आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका, ज्याचा विचार करून रेल्वे निर्णय घेतला जाऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, या संपूर्ण मार्गाचा एक मोठा भाग गुजरातमधून जातो आणि हेही एक कारण आहे. आता वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन नेमके कधी येते आणि कोणत्या मार्गावर सुरू होते, याची उत्सुकता प्रवशांना आहे.