आता वंदे भारत ट्रेन १६ ऐवजी २० कोचसह धावणार, ट्रायलही घेण्यात आली By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 04:03 PM 2024-08-09T16:03:34+5:30 2024-08-09T17:49:18+5:30
Vande Bharat Train : आता वंदे भारत ट्रेनचे कोचही वाढण्यास सुरुवात केली आहे. वंदे भारत ट्रेन या सध्या भारतीय रेल्वेतील सर्वाधिक आधुनिक ट्रेन म्हणून ओळखली जाते. या ट्रेनची सुरूवात २०१९ साली झाली होती. आगामी काळातही केंद्र सरकारने देशभरात विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. दरम्यान, आता वंदे भारत ट्रेनचे कोचही वाढण्यास सुरुवात केली आहे.
आज म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी देशात पहिल्यांदाच २० डबे असलेली वंदे भारत ट्रेन धावली. अहमदाबाद येथून आज सकाळी ७ वाजता या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान २० कोच असलेल्या पहिल्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन सुरू झाली आहे. २० कोच असलेली पहिली वंदे भारत ट्रेन ताशी १३० किलोमीटर वेगाने चालवली जात आहे.
आत्तापर्यंत देशातील मोठ्या शहरांमध्ये १६ कोच आणि लहान शहरांमध्ये ८ कोच असलेली धावते. आतापर्यंत अहमदाबाद ते मुंबई दरम्यान प्रत्येकी १६ कोचच्या दोन वंदे भारत ट्रेन धावत होत्या. मात्र, आजपासून अहमदाबाद ते मुंबई दरम्यान २० कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल सुरू झाली आहे. वंदे भारत ट्रेनच्या या चाचण्या यशस्वी झाल्या तर कालांतराने लोकांना २० कोच असलेल्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा लाभ मिळणार आहे
मुंबई ते अहमदाबाद या ट्रॅकवर दोन वंदे भारत ट्रेन धावतात, प्रत्येक १६ कोचच्या ट्रेनमध्ये ११२८ प्रवासी असतात, ज्यामध्ये प्रत्येकी ५२ सीट आहेत. नवीन २० कोचच्या ट्रेनची क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे अधिक प्रवासी एकत्र प्रवास करू शकतील.
याशिवाय वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवणे हा देखील या चाचणीचा उद्देश आहे, सध्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १२०-१३० किमी आहे, तो ताशी १६० किमीपर्यंत वाढवण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळं मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवास ४५ ते ६० मिनिटांपर्यंत कमी होईल.
मुंबई-सुरत-वडोदरा-दिल्ली कॉरिडॉरवर ताशी १६० वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठीही हे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, या रेल्वे प्रकल्पाची किंमत अंदाजे ३,९५९ कोटी रुपये आहे, तर दिल्ली मार्गाचे एकूण बजेट अंदाजे १०,००० कोटी रुपये आहे. सध्या, वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेससह ५० हून अधिक गाड्या मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावतात. या १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रतितास वेगाने धावतात.