वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वेकडून शानदार योजना; PM नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:59 PM 2022-07-26T21:59:37+5:30 2022-07-26T22:07:44+5:30
vande bharat trains update : रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमी-हाय स्पीड (160-200 किमी प्रतितास) वंदे भारत चाचणी 15 ऑगस्टपूर्वी सुरू होईल. रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनची नवीन आवृत्ती लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, देशातील अशा प्रकारची ही तिसरी ट्रेन असेल आणि चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मधून 12 ऑगस्ट रोजी चाचणीसाठी रवाना होईल.
मंगळवारी ही माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, ही ट्रेन नोव्हेंबरपासून दक्षिण भारतातील विशेष मार्गावर धावण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमी-हाय स्पीड (160-200 किमी प्रतितास) वंदे भारत चाचणी 15 ऑगस्टपूर्वी सुरू होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईहून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात असे सांगण्यात येत आहे. मात्र, सरकारकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. वंदे भारतच्या नवीन आवृत्तीची चाचणी राजस्थानमधील कोटा ते मध्य प्रदेशातील नागदा विभागात केली जाईल.
ट्रेनचा चाचणी वेग 100 ते 180 किमी प्रतितास असेल. दोन ते तीन चाचण्यांमध्ये यश मिळाल्यानंतर नवीन वंदे भारत ट्रेनला व्यावसायिक संचालनासाठी मंजुरी मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानुसार, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन्स रुळांवर धावू लागतील, असा दावा रेल्वेने केला आहे.
इंटिग्रल कोच फॅक्टरीची उत्पादन क्षमता दर महिन्याला सहा ते सात वंदे भारत रेक (ट्रेन) आहे आणि ही संख्या 10 पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरी आणि रायबरेली येथील मॉडर्न कोच फॅक्टरी येथे वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील.
सूत्रांनी सांगितले की, नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि आरामदायी सुविधांसह अनेक बाबींची काळजी घेण्यात आली आहे. सध्या वंदे भारत ट्रेन दिल्ली ते कटरा आणि दिल्ली ते वाराणसी दरम्यान चालवली जात आहे.