Vikas Dubey Encounter: ...अन् दुबेचे 'मृत' वडील अचानक 'जिवंत' झाले; ५ वर्षांनंतर पोलिसांना सापडले By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 04:11 PM 2020-07-10T16:11:14+5:30 2020-07-10T16:16:20+5:30
कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेचा खात्मा करण्यात आला आहे. आज सकाळी विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून विकास दुबेचा शोध सुरू होता. मात्र तो पोलिसांना सातत्यानं गुंगारा देत होता. अखेर काल मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधील महाकाल मंदिरात विकास दुबे आढळून आला.
एका सुरक्षा रक्षकानं विकास दुबेला ओळखलं. यानंतर याबद्दलची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर विकासला अटक करण्यात आली.
विकासला उज्जैनहून कानपूरला आणलं जात असताना सकाळी साडे सहाच्या सुमारास पोलिसांच्या कारला अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या विकासनं पोलीस अधिकाऱ्याची पिस्तुल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
विकासच्या एन्काऊंटरआधी पोलिसांनी त्याचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या अमर दुबेचा खात्मा केला. याच अमर दुबेबद्दलची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
अमर दुबेच्या एन्काऊंटरनंतर पोलीस कानपूरमधल्या बिकरू गावात गेले होते. त्यावेळी त्याचे वडील संजीव दुबे पोलिसांना जिवंत आढळून आले. खूप वर्षांपूर्वी संजीव यांचं निधन झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
विकास दुबेनं अमर दुबे आणि त्याच्या साथीदारांसह बिकरू गावात आठ पोलिसांची हत्या केली. अमर दुबे विकासचा अत्यंत जवळचा साथीदार मानला जातो.
काही दिवसांपूर्वीच अमरचा पोलीस एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. त्याची माहिती देण्यासाठी पोलीस काल बिकरू गावात पोहोचले. त्यावेळी अमर दुबेचे वडील संजीव जिवंत असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली.
खबऱ्यांनी पोलिसांना संजीव लपून बसलेलं ठिकाण दाखवलं. गेल्या दशकभरापासून संजीव लपून बसल्याची माहिती यानंतर उघड झाली.
मुलगा अमरच्या मृत्यूची माहिती समजताच संजीव बाहेर आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं. एका दुर्घटनेतून आपण थोडक्यात वाचलो. पण त्यात पाय गमावला, अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली. संजीववर हत्येचा प्रयत्न, लूट यासारख्या १२ गुन्ह्यांची नोंद आहे.
रस्ते अपघातात पाय गमावल्यानंतर संजीव अचानक गायब झाला. आपण मरण पावल्याची माहिती त्यानं कुटुंबीयांना पसरवण्यास सांगितली. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्यानं हा बनाव रचला.