हिंसा बांगलादेशात पण भारतात हाय अलर्ट; सीमेवर किती धोका, सरकारची तयारी काय? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 09:36 PM 2024-08-06T21:36:24+5:30 2024-08-06T21:47:35+5:30
बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामुळे त्याठिकाणी सत्तापालट झाला आहे. तिथल्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशातून पलायन केले आहे. जगातील सर्वात धोकादायक सीमांमध्ये भारत आणि बांगलादेशची सीमा कायम अतिसंवेदनशील राहिली आहे. भारत आणि बांगलादेशात ४०९६ किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा ही जगातील पाचवी सर्वात मोठी जमिनी सीमा आहे. बांगलादेश अस्तित्वात आल्यानंतर दोन्ही राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली आहे.पाकिस्तानविरुद्धच्या मुक्तीसंग्रामात बांगलादेशाला भारतानं दिलेले समर्थन मोलाचं होतं. त्याकाळी या सीमेने भारतासाठी अनेक आव्हाने उभी केली होती. त्यामुळे ही सीमा भारतासाठी किती संवेदनशील आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमा ४०९६ किमी आहे. जी भारताच्या पाच राज्यांना जोडलेली आहे. त्यात बंगाल(२२१६.७० किमी), आसाम(२६३ किमी), मेघालय(४४३ किमी), त्रिपुरा(८५६ किमी) आणि मिझोरम (३१८ किमी) थेट सीमेशी जोडले गेले आहेत.
या पूर्ण भागात नदी, डोंगर आणि वन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणची लोकसंख्याही खूप अधिक आहे. या सीमेवरून दहशतवादी, तस्कर, घुसखोर आणि गुन्हेगारी विश्वाचा धोका पाहता भारत सरकारने १९८६ साली सीमेवर कुंपण घालण्याचं काम सुरू केले होते.
अनेक प्रयत्नानंतर मार्च २०२३ पर्यंत एकूण ४०९६ किमी पैकी ३१८० किमी सीमेवर कुंपण घालण्यात आलं आहे. भारत सरकारचं लक्ष्य मार्च २०२४ पर्यंत उर्वरित ९१५ किमी कुंपण सीमेवर घालण्याचं होतं, मात्र ते अद्याप पूर्ण होणं बाकी आहे. बांगलादेश - भारताच्या सीमेवरून अनेक प्रकारचे धोके नेहमीच आहेत. यामध्ये दहशतवादी कारवाया, भारतात घुसखोरी, अवैध स्थलांतरितांचा प्रवेश, मानवी आणि अंमली पदार्थांची तस्करी इत्यादींसह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, २०२० ते मार्च २०२४ पर्यंत, सीमा सुरक्षा दलांनी एकट्या भारत-बांगलादेश सीमेवरून सुमारे ८५०० कोटी रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. बांगलादेश सीमेवरून बांगलादेशी नागरिकांचा भारतात होणारा बेकायदेशीर प्रवेश रोखणे, सीमेवर मजबूत कुंपण पूर्ण करणे आणि त्याचे सतत सुरक्षेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.
यासोबतच सीमेपलीकडील दहशतवाद, बनावट भारतीय चलन आणि प्राण्यांची तस्करी यासह इतर गुन्हे रोखणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर गंगा, ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांच्या पाण्याचे संयुक्त व्यवस्थापन यांसारख्या जलविवादांसारख्या समस्याही अडचणीचे कारण बनून राहतात.
सीमावर्ती भारतीय राज्यांमध्ये अवैध स्थलांतरितांमुळे स्थानिक सुरक्षा समस्या वाढत आहेत यात शंका नाही. त्यामुळे राज्यांच्या लोकसंख्येवर वाढत्या दबावासोबतच पायाभूत सुविधांच्या कमतरतेसारखे सामाजिक दबावही दिसून आले आहेत.
बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता या सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) कार्यवाहक महासंचालक दलजीत सिंग चौधरी कोलकाता येथे पोहोचले असून ते शेजारील देशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सीमेवर सैनिकांची तैनाती वाढवण्यात आली असून सर्व जवानांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय भारत सीमेवर कुंपण, लख्ख विद्युत रोषणाई, बोटी आणि तरंगत्या सीमा चौक्यांचा वापर, हाताने धरलेले थर्मल इमेजर, नाईट व्हिजन उपकरणे, ट्विन टेलिस्कोप, मानवरहित हवाई वाहने इत्यादी प्रगत तंत्रज्ञान उपकरणे वापरून सीमेवरील सुरक्षा वाढवली आहे.
बांगलादेश सीमेवर आतापर्यंत बांधलेल्या कुंपणाचा काही भाग कमकुवत अवस्थेत असून त्याची दुरुस्ती आवश्यक आहे तर सीमावर्ती भागात कठोर देखरेखीसह तातडीनं प्रतिसादाचा अभाव ही एक मोठी कमतरता आहे. या सीमेवरील स्थानिक प्रशासन तसेच सुरक्षा दले यांच्यातील समन्वयाचा अभावही मोठी भूमिका निभावतो.