ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून दिल्यानंतर रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करण्यास सज्ज आहे. कंपनी आता DTH सर्विस सुरू करणार असून या महिन्यातच सेट टॉप बॉक्स लॉन्च करणार असल्याचं वृत्त आहे. सिमकार्डप्रमाणे सेट टॉप बॉक्ससाठीही कंपनीकडून वेलकम ऑफर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. वेलकम ऑफरमध्ये प्रमोशन करण्यासाठी कंपनी 90 दिवस सर्विस फ्री देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ग्राहकांना सर्विस आवडल्यानंतरच त्यांच्याकडून पैसे आकारले जातील असं म्हटलं जात आहे. जिओ आपल्या DTH सर्विससाठी महिन्याला 180 ते 200 रूपये आकारण्याची शक्यता आहे. यामध्ये 50 HD चॅनलसह 300 चॅनल पाहता येतील अशी माहिती आहे. यापुर्वीही जिओ सेट टॉप बॉक्स लॉन्च करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आता लीक झालेल्या फोटोंमुळे जिओच्या DTH सर्विसबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. जिओ IP आधारित टीव्ही सर्विस सुरू कऱणार असल्याचं बोललं जात आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या सेट टॉप बॉक्सच्या रिमोटमध्ये माईकचं बटन दिसत आहे त्यामुळे यामध्ये व्हॉइस कमांड देण्याचा पर्याय असण्याची शक्यता आहे. जिओ टीव्ही रिलायन्स जिओ फायबरवर काम करेल असं वृत्त आहे. सेट टॉप बॉक्समध्ये एचडीएमआय पोर्ट, लॅन पोर्ट आणि युएसबी पोर्ट दिसत आहे, पण विशेष म्हणजे यामध्ये RJ-45 पोर्टही आहे. म्हणजे सेट टॉप बॉक्सला हाय स्पीड ब्रॉड बॅंडसोबत कनेक्ट करता येणार आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.