विमान/हेलिकॉप्टर अपघाताचे रहस्य उलगडणारा 'ब्लॅक बॉक्स' नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 01:12 PM 2021-12-09T13:12:32+5:30 2021-12-09T13:19:52+5:30
विमान आणि हेलिकॉप्टरमधील 'ब्लॅक बॉक्स' खूप महत्वाचे उपकरण आहे. या उपकरणामुळे अपघाताची आणि अपघाताच्या कारणांची माहिती मिळते. CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघातग्रस्त हेलीकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, यातून अपघाताविषयी महत्वाची माहिती समोर येईल. नवी दिल्ली: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांना कुन्नूरहून वेलिंग्टनला नेत असताना काल क्रॅश झालेल्या Mi17 V हेलिकॉप्टरचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला आहे. या अपघातात जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीसह अनेक लष्करी अधिकारी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर आता अपघाताविषयी महत्वाची माहिती समोर येणार आहे. पण, हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमका काय असतो, तो कसा काम करतो आणि यातून कोणती माहिती मिळते ? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे.
ब्लॅक बॉक्स काय आहे ?- विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाला किंवा अपघात झाला तर, याबद्दलची सर्व माहिती ब्लॅक बॉक्समध्ये असते. ब्लॅक बॉक्समध्ये एक यंत्र असते, जे विमान/हेलिकॉप्टरच्या उड्डाण आणि लँडींगची सर्व माहिती रेकॉर्ड करत असतो. ब्लॅक बॉक्सला फ्लाइट डेटा रेकॉर्डर(FDR) असेही म्हणतात. विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा कितीही मोठा अपघात झाला तरी, हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा यासाठी त्याला मजबूत धातू टायटॅनियमपासून बनविले जाते.
ब्लॅक बॉक्सचा शोध का लागला ?- सुरुवातीला विमान उड्डाणांची सुरुवात झाली,तेव्हा तंत्रज्ञान फारसे विकसित नव्हते. त्यामुळे अनेकदा विमान रडारच्या बाहेर जात असे किंवा इतर काही कारणामुळे याचे अपघात होत असे. या अपघाताचे कारण शोधणे, त्यावेळेस कठीण होते. त्यामुळे 1950च्या दशकाच्या सुरुवातीला ब्लॅक बॉक्स बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले. विमानांची संख्या आणि फेऱ्या वाढल्याने अपघातही वाढू लागले. त्यानंतर ब्लॅक बॉक्सचे महत्व वाढले. विमानाचा अपघात कसा झाला, चूक कोणाची होती ? इत्यादी कारणे तपासण्यासाठी याचा वापर होऊ लागला.
ब्लॅक बॉक्स नाव कसे पडले ?- 1954 मध्ये वैमानिक संशोधक 'डेव्हिड वॉरन' यांनी ब्लॅक बॉक्सचा शोध लावला. सुरुवातीला या बॉक्सला लाल रंगामुळे लाल अंडी असे म्हटले जायचे. पण नंतर या बॉक्सचा आतील भाग गडद काळ्या रंगाचा असल्यामुळे या बॉक्सला 'ब्लॅक बॉक्स' असे संबोधले जाऊ लागले. मूळात, या बॉक्सला ब्लॅक बॉक्स म्हणत असले तरी, याचा बाहेरील भाग लाल रंगाचा असतो. कितीही मोठा अपघात झाला, बॉक्स झाडात किंवा मातीत किंवा इतर कुठल्याही ठिकाणी पटकन ओळखू यावा म्हणून याला गडद लाल रंग दिला जातो.
हे कसे कार्य करते ?- हा ब्लॅक बॉक्स टायटॅनियम या धातूपासून बनलेला असल्याने सुरक्षित असतो. विमानात भीषण आग लागली तरी, या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही. कारण, 1 तास 10000 डिग्री सेंटीग्रेड तापमान सहन करण्याची क्षमता या बॉक्सची असते. यानंतरही पुढील 2 तास हा बॉक्स सुमारे 260 अंश तापमान सहन करू शकतो. त्याची एक खासियत म्हणजे हा बॉक्स जवळपास महिनाभर विजेशिवाय काम करतो, म्हणजेच अपघातग्रस्त जहाज शोधण्यात वेळ लागला तरी डेटा बॉक्समध्ये सेव्ह होत राहतो.
यातून सतत तरंग निघतात- अपघात झाल्यास ब्लॅक बॉक्समधून सतत आवाज येत असतो, जो शोध पथकांना दुरूनच ओळखता येतो आणि त्यामुळे अपघाताच्या ठिकाणी पोहोचता येते. समुद्रात 20,000 फूट खाली पडल्यानंतरही या बॉक्समधून आवाज आणि तरंग बाहेर पडत राहतात आणि त्या सतत 30 दिवस सुरू राहतात. या बॉक्सचा शोध लागल्यानंतर प्रत्येक विमानात ब्लॅक बॉक्स ठेवण्यास सुरुवात झाली. हा बॉक्स प्रत्येक विमानाच्या मागच्या बाजूला ठेवला जातो जेणेकरून अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो.
व्हॉईस रेकॉर्डर देखील मदत करते- फक्त ब्लॅक बॉक्सच नाही तर विमानातील आणखी एक गोष्ट डेटा काढण्यात मदत करते, ती म्हणजे 'कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर' (CVR). हा प्रत्यक्षात ब्लॅक बॉक्सचाच एक भाग आहे. त्यात विमानातील शेवटच्या दोन तासांचे आवाज रेकॉर्ड केले जातात. यामध्ये इंजिनचा आवाज, इमर्जन्सी अलार्मचा आवाज आणि कॉकपिटमधील आवाज म्हणजेच पायलट आणि को-पायलटमधील संभाषण रेकॉर्ड केले जाते. हे देखील केरळमधील अपघातस्थळावरून जप्त करण्यात आले आहे.