एसी ट्रेनच्या डब्यातील चादरी आणि ब्लँकेट किती वेळा धुतात? RTI मधून धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:18 PM 2024-10-22T17:18:20+5:30 2024-10-22T17:24:34+5:30
Indian Railways : भारतीय रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुरविलेले ब्लँकेट भारतीय रेल्वे किती वेळा धुते याची माहिती एका आरटीआयच्या उत्तरातून समोर आली आहे. ट्रेनच्या एसी कोचमध्ये प्रवास करताना, तुम्हाला एक बेडरोल दिला जातो ज्यामध्ये दोन चादरी, उशी आणि ब्लँकेट असते. जेणेकरुन तुम्ही पुढचा प्रवास आरामात करू शकता. पण रेल्वे हे बेडशीट, चादरी आणि उशी किती वेळा धुतात याची तुम्हाला कल्पना आहे का?
रेल्वेच्या एसी कोचमध्ये प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशाला दोन चादरी,उशी आणि ब्लँकेट रेल्वे प्रशासनाकडून पुरवले जाते. मात्र आता याच्या स्वच्छतेबाबात माहिती अधिकाराच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतीय रेल्वे एसी डब्यांमध्ये नवीन मटेरियल ब्लँकेट देणार येत असून स्वच्छता वाढवण्यासाठी, रेल्वेने दोन महिन्यातून एकदा ब्लँकेट धुण्याची सध्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आरटीआय म्हटले आहे की, प्रवाशांना दिलेले बेडरोल प्रत्येक वापरानंतर धुतले जाते. लोकरीच्या चादरी महिन्यातून एकदा किंवा दोनदा धुतल्या जातात, असेही रेल्वेने आरटीआयद्वारे सांगितले आहे. ही धुण्याची प्रक्रिया त्यांच्या उपलब्धता आणि पुरवठ्यावर अवलंबून असते.
वेगवेगळ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या २० सदस्यांनी सांगितले की, ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतात. तर एका कर्मचाऱ्याने सांगितले की, प्रत्येक प्रवासानंतर आम्ही बेडशीट आणि पिलो कव्हर बंडलमध्ये लॉन्ड्रीला देतो. ब्लँकेटच्या बाबतीत, आम्ही त्यांना व्यवस्थित दुमडून ठेवतो. जेव्हा वास येतो किंवा त्याच्यावर जेवणाचा डाग लागलेला असतो तेव्हा आम्ही त्यांना लॉन्ड्रीमध्ये पाठवतो.
आणखी एका कर्मचाऱ्याने सांगितले की, 'महिन्यातून दोनदा ब्लँकेट्स धुतात याची शाश्वती नाही. बहुतेक वेळा जेव्हा दुर्गंधी, ओलेपणा इत्यादी तक्रारी येतात तेव्हाच आम्ही ब्लँकेट धुण्यासाठी देतो. काही प्रकरणांमध्ये, प्रवाशाने तक्रार केल्यास, आम्ही ताबडतोब स्वच्छ ब्लँकेट देतो.
रेल्वेने दिलेल्या आरटीआयच्या उत्तरात असेही म्हटले आहे की, "बेडरोल्स धुण्याचा खर्च हा सर्व रेल्वेच्या भाड्यात समाविष्ट असतो. गरीब रथ आणि दुरांतो सारख्या ट्रेनमध्ये तिकीट बुक करून, प्रत्येक किटनुसार शुल्क भरून बेडरोल्स वापरता येतात."