Draupadi Murmu Emotional Story: कोण आहेत द्रौपदी मुर्मू? 42 वर्षांची लव्हस्टोरी; पतीसह तीनही मुलांचे निधन; खडतर आयुष्य जगल्या... By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 03:00 PM 2022-07-18T15:00:01+5:30 2022-07-18T15:07:00+5:30
Draupadi Murmu's Emotional Story: दिल्लीपासून 1650 किमी लांबवरचे भुवनेश्वर, तेथून ३०० किमी लांब मयूरभंज आणि तेथून आणखी २५ किमी दूरवर असलेले आदिवासी गाव पहाड़पुर. तेवढेच खडतर... राष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत आहे. जवळपास एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोण आहेत या द्रौपदी मुर्मू? आदिवासी समाजातील आहेतच, परंतू त्यांचे आयुष्य म्हणजे एक खडतर प्रसंगांनी भरलेले आहे. पती आणि तीन मुलांचा मृत्यू या महिलेने पाहिलेला आहे.
दिल्लीपासून 1650 किमी लांबवरचे भुवनेश्वर, तेथून ३०० किमी लांब मयूरभंज आणि तेथून आणखी २५ किमी दूरवर असलेले आदिवासी गाव पहाड़पुर. कच्चे घर असा हा द्रौपदी मुर्मू यांच्या घराचा परिसर आहे. दिल्लीपर्यंत जाण्याची ही वाट जेवढी खडतर आहे तेवढेच मुर्मू यांचे आयुष्यही खडतर आहे.
शाम चरण हे त्यांचे पती. ४२ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८० मध्ये त्यांचा प्रेम विवाह झाला होता. या विवाहाची गोष्टही वेगळीच आहे. पुर्वाश्रमीच्या द्रौपदी टुडू या भुवनेश्वरला कॉलेजमध्ये शिकत होत्या. द्रौपदी यांचे माहेर उपरवाड़ा हे गाव होते. ते देखील आदिवासीच गाव. 1969 ते 1973 पर्यंत त्या आदिवासी विद्यायलात शिकल्या. तेथून पुढचे ग्रॅज्युएशन द्रौपदी यांनी रामा देवी वुमंस कॉलेजमध्ये केले.
कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची ओळख शाम चरण यांच्याशी झाली. ते देखील भुवनेश्वरच्या एका कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांमध्ये प्रेम झाले. १९८० मध्ये शाम हे द्रौपदी यांच्या घरी मागणी घालण्यासाठी आले. द्रौपदी यांचे वडील बिरंची नारायण टुडू यांना मुलगा पसंत नव्हता.
द्रौपदी या संथाल समाजातून येतात. शामदेखील त्याच समाजाचे होते. तरीही वडिलांचा लग्नाला विरोध होता. शाम यांनी आपल्या तीन काकांसोबत द्रौपदी यांच्याच गावात बस्तान मांडले. तीन-चार दिवस झाले आलेला पोरगा काही हलण्याचे नाव घेत नाहीय. इकडे द्रौपदी यांनीदेखील लग्न करेन तर याच्याशीच असा हेका धरला. वडिलांचे मन बदलण्यात दोघेही यशस्वी ठरले.
लग्न ठरले आता हुंड्याची बोलणी सुरु झाली. संथाल समाजात मुलाकडचे मुलीकडच्यांना हुंडा देतात. एक गाय, एक बैल आणि १६ जोडी कपडे देण्याची बोलणी झाली. शाम यांनी लगेचच होकार दिला आणि आपल्या गावी परतले. शाम चरण यांचे काका सांगतात की, १९८० मध्ये लग्न झाले हे सर्वांना माहिती आहे, परंतू तारीख माहिती नाही. तेव्हा तारखेला महत्वा नसायचे.
यानंतर सुरु झाला शाम आणि द्रौपदी यांचा संसार. परंतू नियतीला तो मान्य नव्हता. १९८४ मध्ये द्रौपदी यांच्या तीन वर्षांच्या मुलीचे निधन झाले. यानंतर दोन मुले झाली. २०१० मध्ये पहिल्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन वर्षांनी दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत नाही तोच पुढच्याच वर्षी २०१४ मध्ये पती शाम यांचेही निधन झाले.
द्रौपदी यांनी सारे काही गमावलेले. घराचे त्यांनी शाळेत रुपांतर केले. त्या मुलांच्या आणि पतीच्या पुण्यतिथीला दर वर्षी त्या शाळेत येतात. त्यांच्या स्वागतासाठी गावात बॅनर लावण्यात आले आहेत. द्रौपदी विजयी व्हाव्यात यासाठी पारंपरिक नृत्य आणि देव पूजा केली जात आहे.