Gyanesh Kumar: कोण आहेत निवडणूक आयोगाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 09:20 IST2025-02-18T09:12:29+5:302025-02-18T09:20:32+5:30

Who is Gyanesh Kumar: निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानेश कुमार यांची मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी ते मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त पदापर्यंतचा त्याचा प्रवास जाणून घ्या...

राजीव कुमार यांचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी रोजी संपत असल्याने १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १९८८ च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांची मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत असणार आहे.

ज्ञानेश कुमार हे १९८८ च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी राहिले आहेत. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९६४ रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला होता. त्यांनी वाराणसीमधील क्विन्स कॉलेज आणि लखनौमधील कॉल्विन तालुकेदार कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

ज्ञानेश कुमार यांनी आयआयटी कानपूरमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले. आयसीएफएआयमध्ये बिझनेस फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर ज्ञानेश कुमार यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून पर्यावरण अर्थशास्त्र विषयातही पदव्युत्तर पदवी घेतली.

१९८८ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेसाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर केरळमधील एर्नाकुलमध्ये त्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पहिली नियुक्ती झाली. अडूरचे उपजिल्हाधिकारी, राज्य अनुसूचित जाती आणि जमाती विकास परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक, कोचीन पालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केले.

पुढे त्यांनी केरळ प्रशासनामध्ये अर्थ, सार्वजनिक बांधकाम, जलदगती प्रोजक्टचे सचिव म्हणूनही काम केले. त्यानंतर ते केंद्रात आले. केंद्रात संरक्षण विभागाचे सह सचिव, गृह मंत्रालयाचे सह सचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून काम केले. संसदीय कार्य मंत्रालयाचे ते सचिव बनले. त्यानंतर नव्याने सुरू करण्यात आलेल्या सहकार विभागाचे सचिव म्हणून काम केल्यानंतर ते ३१ जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले.

केंद्रीय गृह मंत्रालयात कार्यरत असताना त्यांनी कलम ३७० रद्द केल्यानंतर निर्णयांची अमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. इतकच नाही, तर केंद्र सरकारने त्यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून राम मंदिर ट्रस्ट सदस्य म्हणूनही नियुक्त केले होते.

ज्ञानेश कुमार यांची १४ मार्च २०२४ रोजी त्यांची केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता त्यांची मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या निवडणूक आयुक्त पदावर विवेक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते १९८९च्या बॅचचे हरयाणा केडरचे अधिकारी आहेत.