UAPAमध्ये वाँटेड, ६ वर्षे तुरुंगात; असा आहे नारायणसिंग चौराचा गुन्हेगारी इतिहास By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:22 PM 2024-12-04T15:22:14+5:30 2024-12-04T15:30:55+5:30
who is Narain singh chaura Amritsar firing news: शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे नारायणसिंग चौरा! पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात खळबळ उडवणारी घडना घडली. माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली, पण वेळीच एकजण धावल्याने गोळी दुसरीकडे गेली.
सुखबीरसिंग बादल यांना श्री अकाल तख्त साहिबने धार्मिक शिक्षा सुनावली आहे. बुधवारी दुपारी ते सुवर्ण मंदिराच्या दारात भाला घेऊन चौकीदारी करत असतानाच एक व्यक्ती तिथे आला आणि सुखबीरसिंग यांच्यावर निशाणा धरला. एक व्यक्ती पुढे आला आणि त्याने आरोपीचा हात वर गेला. त्यामुळे गोळी हवेत झाडली गेली.
आरोपीला पकडण्यात आले. नारायण सिंह चौरा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. आरोपी बब्बर खालसा संघटनेशी संबधित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नारायण सिंह चौरा हा बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दहशतवादी आहे. १९८४ मध्ये तो पाकिस्तान गेला होता. दहशतवाद वाढण्याच्या सुरूवातीच्या काळात पंजाबमध्ये शस्त्र आणि स्फोटकांची तस्करी करण्यात तो सहभागी राहिला आहे.
त्याने गुरिल्ला युद्ध आणि देशद्रोही साहित्य यावर एक पुस्तकही लिहिले आहे. UAPA कायद्याखाली त्याच्यावर गुन्हा दाखल दाखल होता. वाँटेंड आरोपी राहिलेला आहे. नारायणसिंग चौरा याने पंजाबच्या तुरुंगात कारावास भोगला आहे.
नारायणसिंग चौरा याला २८ फेब्रुवारी २०१३ मध्ये तरन तारन साहिब जिल्ह्यातील जलालाबाद गावातून अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात एक डझनपेक्षा जास्त गुन्हे आहेत. ८ मे २०१० रोजी त्याने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात स्फोट घडवला होता. तो २०१८ मध्ये तुरुंगातून सुटला होता.
आरोपी नारायणसिंग चौरा याने खलिस्तानवर एक पुस्तकही लिहिले आहे. 'कॉन्सिपिरेसी अगेन्स्ट खलिस्तान', असे त्या पुस्तकाचे नाव आहे. अलिकडेच नारायणसिंग चौराला अमृतसरमध्ये पंजाब पोलिसांच्या विशेष शाखेने मोठ्या शस्त्रसाठ्यासह पकडले होते.