स्वत:ला तुर्रम खां समजतोस काय?...हे तुम्हीही कधीतरी ऐकलं असेलच, पण तुर्रम खां नेमके होते तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 04:22 PM2023-03-21T16:22:20+5:302023-03-21T16:35:10+5:30

'तू काय स्व:ला तुर्रम खान समजतोस काय' किंवा 'स्वतःला मोठा तुर्रम खान समजू नकोस' हे असं तुम्हीही कधीतरी ऐकलं असेल किंवा मग तुम्ही कुणाला तरी असं म्हणालेलेही असाल. जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ला मोठं दाखवण्याचा किंवा आपण कुणीतरी शहाणं असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा अशा व्यक्तीला जमिनीवर आणण्यासाठी सहसा आपण त्याला असं म्हणतो.

पण स्वत:ला काहीतरी मोठं किंवा शहाणं समजणाऱ्या व्यक्तीसाठी 'तुर्रम खान' हे नाव का वापरले जाते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अखेर खरा तुर्रम खान कोण होता, ज्याच्या नावाचे दाखले आज दिले जातात.

तुर्रम खान यांचे खरे नाव तुर्रेबाज खान होते. तुर्रम खान हा इतिहासातील एक पराक्रमी योद्धा मानला जातो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या लढाईत त्यांचा मोठा वाटा होता. तुम्हाला माहित असेल की 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी सर्वप्रथम बॅरकपूरमध्ये सुरू झाली होती, जिथे मंगल पांडे यांनी स्वातंत्र्य लढा सुरू केला होता. या स्वातंत्र्य चळवळीची धग हैदराबादपर्यंत पोहोचली, जिथं तुर्रेबाज खान यांनी नेतृत्व केलं.

इतिहासात हैदराबादच्या या लढाईचा फारसा उल्लेख नाही. पण स्वातंत्र्य लढ्यात तुर्रेबाजने ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला केला होता. त्यांनी इंग्रजांविरुद्ध तब्बल ६००० सैनिकांची फौज तयार केली आणि नेतृत्व केलं. खरंतर पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात हैदराबादचे जमादार चिदा खान यांनी दिल्लीला जाण्यास नकार दिला होता. अशा स्थितीत इंग्रजांनी त्यांना धोका देत कैद केलं. त्यांना सोडवण्याची जबाबदारी तुर्रेबाज खान यांनी घेतली आणि इंग्रजांवर हल्ला केला होता.

चिदा खानला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याची योजना तुर्रेबाज खानने घेतली होती. त्यांनी ५०० लोकांच्या फौजफाट्यासह रात्री रेसिडेन्सी हाऊसवर हल्ला चढवला. एका देशद्रोही व्यक्तीनं त्यांचा विश्वासघात केला आणि या योजनेची माहिती इंग्रजांना आधीच दिली होती. निजानचा वजीर सालारजंग याने तुर्रेबाज खान यांचा विश्वासघात केला असे म्हणतात.

तुर्रेबाज खान रेसिडेन्सी हाऊसवर पोहोचला तेव्हा इंग्रज आधीच तोफा आणि बंदुका घेऊन सज्ज होते. तुर्रम खानला इंग्रजांच्या या योजनेची अजिबात कल्पना नव्हती. त्यांच्याकडे फक्त तलवारी होत्या. त्यांनी हल्ला केल्यावर इंग्रजांनी त्यांच्या सैन्यावर तोफांचा आणि बंदुकांचा अक्षरश: वर्षाव सुरू केला.

तुर्रेबाज खानकडे शस्त्रं आणि सैन्य कमी होते, तरीही त्यांनी रात्रभर इंग्रजांचा सामना केला. या युद्धात इंग्रज तुर्रेबाज यांना पकडू शकले नाहीत आणि गोर्‍यांच्या एवढ्या मोठ्या सैन्याला चकवा देऊन ते तिथून निसटले, असे म्हणतात.

फरार असलेल्या तुर्रम खान यांनी ब्रिटिश सरकारची चिंता वाढवली होती. ते जंगलात लपले होते. पण एका देशद्रोहीने याची माहिती इंग्रजांना दिली आणि त्यांना जंगलातून पकडण्यात आलं. हैदराबाद न्यायालयानं त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली.

काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्यांमध्ये त्याच्या नावाची गणना होते. तुर्रम खान जानेवारी १८५९ मध्ये तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. यानंतर इंग्रजांनी त्यांच्यावर ५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पण काही दिवसांनी देशद्रोही तालुकदार मिर्झा कुर्बान अली बेग याने तुपारनच्या जंगलात विश्वासघात करून त्यांची हत्या केली. पण आजही तुर्रेबाज खान म्हणजेच तुर्रम खान त्यांच्या शौर्यासाठी आणि शौर्यासाठी स्मरणात आहेत.